खान्देशात कापूस उत्पादनात १० लाख गाठींची घट; पुढील वर्षी १० टक्के पेरा कमी होण्याची शक्यता

राज्यात सर्वाधिक कापूस उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या खान्देशात यंदा मोठ्या प्रमाणावर कापसाची लागवड होऊन देखील प्रत्यक्ष उत्पादनात दहा लाख गाठींची घट आली आहे.
खान्देशात कापूस उत्पादनात १० लाख गाठींची घट; पुढील वर्षी १० टक्के पेरा कमी होण्याची शक्यता

विजय पाठक/जळगाव

राज्यात सर्वाधिक कापूस उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या खान्देशात यंदा मोठ्या प्रमाणावर कापसाची लागवड होऊन देखील प्रत्यक्ष उत्पादनात दहा लाख गाठींची घट आली आहे. त्याचा परिणाम म्हणून आगामी वर्षात खान्देशात कापसाचा पेरा हा दहा टक्क्याने कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कापूस हे खान्देशातील शेतकऱ्यांचे नगदी पीक आहे. खान्देशचे अर्थकारण हे मोठ्या प्रमाणात कापसावर चालत असते. कापसावर जिनिंग प्रेसिंग करणारे १५० वर कारखाने खान्देशात असून त्यावर मोठ्या प्रमाणावर रोजगार अवलंबून असल्याचे खान्देश जिनिंग जिन प्रेस कारखानदार संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप जैन सांगतात. जळगाव, धुळे नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कापसाचा पेरा होत असतो. खान्देशात यंदा नऊ लाख हेक्टरमध्ये कापसाची लागवड झाली होती. यातून २५ लाख गाठींचे कापसाचे उत्पादन अपेक्षित होते. प्रत्यक्षात पावसाचा मोठा पडलेला खंड कापसावर पडलेला बोंड अळीचा प्रादुर्भाव यामुळे कापसाचे उत्पादन घटले. १४ लाख गाठींचा कापूस हा शेतकऱ्यांकडून जिनिंग कारखानदारांनी खरेदी केला गेला. काही कापूस हा गुजरातेत गेला तर लाखभर गाठींचा कापूस हा आज शेतकऱ्याच्या घरात पडून असून शेतकरी कापसाला भाव वाढवून मिळेल या आशेने तो विकत नाही, अशी स्थिती आहे.

खान्देशातील कापसाचा हंगाम हा संपला असून जिनिंग कारखाने बंद होण्याच्या मार्गावर आहेत. दहा लाख गाठींचा कापूस कमी आल्याने त्याचा फटका जिनिंग कारखान्यांना बसला आहे. राज्यातील कापूस राज्यातच रहायला हवा पण तो बाहेरच्या राज्यात जात असून बाहेर जाणारा कापूस अडवण्याचा प्रयत्न आपल्या राज्याकडून होत नाही. त्याचा फटका राज्याचा महसुलावर होतो, येथील रोजगार बुडत असल्याचे कारखानदारसंघाचे संचालक अनिल सोमाणी यांनी सांगितले. तर यंदा कापसाचे उत्पादन घटल्याने जिनिंग कारखाने केवळ दोन महिने सुरू राहिले. सध्या केवळ १५० पैकी ५० कारखाने देखील एका पाळीत सुरू नाहीत, असे वास्तव कारखानदार संघाचे संचालक अविनाश काबरा यांनी सांगत याचा परिणाम पुढील वर्षी जाणवणार असून कापसाचा पेरा हा दहा टक्क्यांनी कमी होईल आणि शेतकरी कापसाऐवजी मका, तूर अशा पिकांकडे वळतील, अशी भीती व्यक्त केली.

सध्या शेतकऱ्यांकडे जो कापूस घरात आहे, तो भाव वाढतील या आशेने ते विकत नाहीत, मात्र सध्याची आंतरराष्ट्रीय बाजाराची स्थिती पाहता भाव वाढण्याची शक्यता कमी असल्याचे अविनाश काबरा यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in