

पुणे : पुण्यातील गर्भवती महिला तनिषा उर्फ ईश्वरी भिसे यांच्या दुर्दैवी मृत्यूप्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासन दोषी ठरले आहे. प्रकरणी धर्मादाय आयुक्तांनी रुग्णालयाचे विश्वस्त पंडित हृदयनाथ मंगेशकर, भारती मंगेशकर, उषा मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर, तसेच डॉ. धनंजय केळकर, डॉ. उल्कांत कुर्लेकर, डॉ. जितेंद्र क्षीरसागर, विधिज्ञ पी. एम. खिरे, सचिन व्यवहारे, आर. पी. जोशी आणि डॉ. प्रसाद राजहंस यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची शिफारस केली आहे.
गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात गर्भवती तनिषा भिसे यांना तातडीने प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल केले गेले होते. मात्र, रुग्णालयाने अनामत रक्कम भरली नसल्याचा आधार देत तिला उपचारास नकार दिला. उशीर झाल्यामुळे तिला दुसऱ्या रुग्णालयात हलवावे लागले, पण उपचारास उशीर झाल्यामुळे ती मृत्युमुखी पडली. अहवालानुसार, रुग्णालय प्रशासन दोषी आढळले आहे. हा खटला सहधर्मादायायुक्त कार्यालयाचे निरीक्षक सचिन बाकल यांनी न्यायालयात दाखल केला आहे. दोष सिद्ध झाल्यास संबंधित विश्वस्तांना एक वर्षाचा कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा भोगावी लागू शकते. सध्या हा प्रकरण शिवाजीनगर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे वर्ग करण्यात आले आहे.