
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याने शिवसेनेत दोन गट निर्माण झाले. यानंतर निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता मिळाली. अशात ठाकरे गटात राहिलेल्या नेत्यांच्या मागे तपास यंत्रणांचा ससेमिरा लावला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. आता ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांना पक्षांतर करा. नाहीतर तुरुंगात जा असे धमकावले जात असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
"शिवसेनेतील आमचे सहकारी नेते आमदार रवींद्र वायकर यांच्यावर गेल्या काही दिवसापासून ED वैगरे तपास यंत्रणांच्या माध्यमातून प्रचंड दबाव सुरू आहे..येत्या काही दिवसात शिवसेना सोडा..पक्षांतर करा.. नाहीतर तुरुंगात जा असे त्यांना धमकावले जात आहे.हा एक प्रकारे दहशतवाद आहे.असे राजकारण या आधी कधीच घडले नव्हते..रवींद्र वायकर हे निष्ठावंत शिवसैनिक असून ते कोणत्याही धमक्या आणि दबावाला भीक घालणार नाहीत..ते लढतील व जिंकतील.आम्ही सर्व त्यांच्या सोबत आहोत", असे राऊत यांनी म्हटले आहे.
ठाकरे गटाचे नेते व माजी मंत्री रवींद्र वायकर यांची ईडीकडून जोगेश्वरी भूखंड गैरव्यवहार प्रकरणी चौकशी सुरू आहे. वायकर यांनी दोनवेळा ईडी चौकशी टाळली. परंतु, आता त्यांना धमक्या येत असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. त्यांनी 'एक्स'वर याबाबतची पोस्ट केली आहे.
काय आहे प्रकरण?
जोगेश्वरी भूखंड आणि पंचतारांकित हॉटेल प्रकरणातील आर्थिक व्यवहारांबाबत ईडीकडून चौकशी सुरु आहे. महापालिकेचे उपअभियंता संतोष मांडवकर यांच्या तक्रारीवरून या प्रकरणी सप्टेंबर महिन्यात आझाद मैदान पोलीस ठाण्यात रवींद्र वायकर यांच्यासह त्यांची पत्नी मनीषा वायकर, त्यांच्या व्यावसायिक भागीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करीत आहे. याच गुन्ह्याच्या आधारावर ईडीने नोव्हेंबर महिन्यात एन्फोर्समेंट केस इन्फर्मेशन रिपोर्ट (ईसीआयआर) दाखल केला होता. ईडीने याप्रकरणी वायकर यांच्या घरासह सात ठिकाणी छापे टाकले होते.
दरम्यान, वायकर यांच्यासह ठाकरे गटाच्या इतर नेत्यांचीही चौकशी सुरु आहे. ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांचीदेखील कथित कोविड बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी चौकशी झाली होती. तसेच ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सुरज चव्हाण यांना कथित खिडची घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आली होती.