
वसई : पालघर जिल्ह्यातील देहरजी धरण प्रकल्प आता अंमलबजावणीच्या महत्त्वपूर्ण टप्प्यावर पोहोचला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) याच्या निधी पुरवठ्यामुळे या प्रकल्पाला गती मिळाली असून, अंमलबजावणीची जबाबदारी कोकण पाटबंधारे विकास महामंडळाकडे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली, उपमुख्यमंत्री आणि एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी (भा.प्र.से.) यांच्या धोरणात्मक दिशादर्शनाने प्रकल्पाच्या कामाला चालना मिळाली असून पालघर जिल्ह्यातील देहरजी प्रकल्पात महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्यात आला आहे.
विक्रमगड क्षेत्रात पावसाने नियमित हजेरी लावल्याने २२ जून रोजी दुपारच्या सुमारास देहरजी धरणातील पाण्याने ५.१४७ दशलक्ष घनमीटरची (एमसीएम) पातळी गाठली. या धरणाच्या एकूण ९५.६० दशलक्ष घनमीटर साठवण क्षमतेच्या ५% इतके हे धरण भरले आहे. धरणाच्या जलसाठ्याची सापेक्ष पातळी ९०.०० मीटरपर्यंत वाढली. त्यामुळे स्पिलवेवर १०९.१४ दशलक्ष घनमीटर/सेकंद या गतीने विसर्ग करण्यात आला. धरणात पाणी साठण्याची ही पहिलीच वेळ होती आणि यातून धरणाची कार्यक्षमता तसेच त्याच्या बांधकामाचा भक्कमपणा सिद्ध झाल्याचा आनंद व्यक्त केले जात आहे. धरणाच्या ९० मीटर सापेक्ष पातळीपर्यंत अंशतः जलसाठा निर्माण झाला आहे. या ठिकाणी नदीच्या तळाच्या ६६.३६ या सापेक्ष पातळीशी तुलना करता धरणामध्ये सुमारे २३.६४ मीटर इतकी पाण्याची सापेक्ष खोली साध्य करण्यात आली आहे.
हा टप्पा म्हणजे या प्रकल्पाच्या टप्प्याटप्प्याने होणाऱ्या अंमलबजावणीच्या यशाचे प्रतीक आहे. या प्रकल्पातून एमएमआरडीएची जलसुरक्षेप्रति असलेली वचनबद्धता, प्रादेशिक पातळीवर सर्वांचा समान विकास करण्याचे प्रयत्न आणि हवामान बदलाशी जुळवून घेत उभारलेल्या पायाभूत सुविधा प्रतिबिंबित होतात. पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील सुकसाळे गावाजवळून वाहणाऱ्या पश्चिम वाहिनी वैतरणा नदीची उपनदी असलेल्या देहरजी नदीवर देहरजी प्रकल्प राबविण्यात येत आहे.
प्रकल्प सुरू झाल्यानंतर देहरजी धरणातून दर दिवशी २५५ दशलक्ष लिटर (एमएलडी) इतका खात्रीशीर पाणीपुरवठा होईल. १९० एमएलडी वसई-विरार महानगरपालिका , ५० एमएलडी सिडको पालघर क्षेत्र, १५ एमएलडी पाणीपुरवठा मार्गावर असलेल्या ग्रामीण भागांसाठी एमएमआरडीए सध्या सर्वसमावेशक पेयजल पुरवठा योजनेसाठी विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला जात आहे.
जेणेकरून या भागातील शहरी व नीम-ग्रामीण भागांना समान व शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध होईल.
महाराष्ट्राच्या दीर्घकालीन जल पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करण्याच्या आमच्या मिशनमधील एक महत्त्वाचा टप्पा आहे. राज्यातील प्रशासकीय विभाग आणि अंमलबजावणी संस्थांसोबतच्या समन्वयासह एमएमआरडीएच्या तत्परतेमुळे देहरजीसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांची अंमलबजावणी वेगाने होत आहे. यासारख्या प्रकल्पांमुळे शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये शाश्वत पाणीपुरवठा सुनिश्चित होणार आहे.
- एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री व एमएमआरडीएचे अध्यक्ष
९० मीटर सापेक्ष पातळीवर ५% वापरयोग्य जलसाठा आणि विसर्ग साध्य करणे हा देहरजी प्रकल्पाच्या अभियांत्रिकीच्या व नियोजनाच्या दृष्टीने एक मोठा टप्पा आहे. नदीच्या तळापासून सुमारे २३.६४ मीटर खोलीसह ९० मीटरची सापेक्ष पातळी असलेला अंशतः जलसाठा तयार करण्यात आला आहे. हा प्रकल्प वसई-विरार आणि पालघर येथील सुविधा विकासाचा एक आदर्श ठरेल.
-डॉ. संजय मुखर्जी (भा.प्र.से.), महानगर आयुक्त एमएमआरडीए
प्रकल्पाची मुख्य वैशिष्ट्ये
एकूण साठवण क्षमता: ९५.६० दशलक्ष घनमीटर
वापरयोग्य साठवण: २५५ दशलक्ष लिटर प्रति दिवस
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे योगदान : १,६८९.४२ कोटी
भूसंपादन आणि पुनर्वसन : ३,६४.८२ कोटी
एकूण सुधारित प्रशासकीय मंजुरी: २,५९९.१५ कोटी
प्रकल्प पूर्ण होण्याचे लक्ष्य : २०२७च्या अखेरीस
देहरजी प्रकल्प हा सरकारच्या जलसुरक्षा सज्ज आणि हवामान बदलाच्या परिस्थितीशी जुळवून घेत त्यावर मात करणारा महाराष्ट्र घडविण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे प्रतीक आहे. हा टप्पा साध्य केल्याने सहयोगात्मक प्रशासन आणि दीर्घकालीन नियोजनाची प्रचिती येते. पालघर आणि आसपासच्या भागांमध्ये राहणाऱ्या लोकांना या प्रकल्पाचा फायदा होणार आहे.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री