
मुंबई : धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यास विलंब झाल्याची स्पष्ट कबुली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिली. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी मंत्र्यांच्या जवळचा होता. त्यामुळे मंत्र्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देण्याची गरज होती. पण आघाडीचे सरकार असल्यामुळे निर्णय घेण्यास उशीर झाला. पण आम्ही ठामपणे निर्णय घेतला आणि त्यांनी राजीनामा दिला, असे फडणवीस यांनी सांगितले. आरोपपत्र दाखल झाल्यानंतरच देशमुख हत्याकांडाचे फोटो माझ्या पाहण्यात आले, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, धनंजय मुंडे यांचा राजीनामा योग्यवेळी झाला की, चुकीच्यावेळी झाला या चर्चेला आता अर्थ नाही. कारण, राजकारणात लोकांना जे बोलायचे असते ते बोलतात. ज्या प्रकारे हत्या झाली त्याचे फोटो आले आणि हत्येचा मास्टरमाइंड ज्याला म्हटले गेले तो मंत्र्याच्या जवळचा असेल, तर मंत्र्याने नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला पाहिजे. पण हे आघाडी सरकार आहे, त्यामुळे निर्णय घेण्यास उशीर होत होता. पण अखेर आम्ही ठामपणे निर्णय घेतला आणि त्यांनी राजीनामा दिला. धनंजय मुंडेंना राजीनामा देण्यासाठी धमकी दिली होती का? असा प्रश्न केला असता मुख्यमंत्र्यांनी मला जे सांगायचे होते, ते मी सांगितले. त्यापेक्षा अधिक सांगणे योग्य नाही, असे स्पष्ट करत याबाबत अधिक भाष्य करण्यास नकार दिला.
आरोपपत्र दाखल झाल्यानंतरच फोटो पाहिले
ज्यावेळी ही घटना घडली त्यानंतर मी त्याची सीआयडी चौकशी लावली होती. मी सीआयडीच्या लोकांना सांगितले की, त्यात हस्तक्षेप नसेल. त्यानंतर आमच्या फॉरेन्सिक टीमने डिलीट केलेले व्हिडिओ व हरवलेले मोबाईल शोधले. त्यांनी पूर्ण डेटा दिला. त्यामुळे हे फोटो समोर आले. ते फोटो कुणी शोधले नाही. ज्या दिवशी चार्जशीट दाखल झाली, त्यावेळी मला तपासाबाबत कळले. चार्जशीट दाखल झाल्यानंतरच मी फोटो पाहिले. असे फडणवीस म्हणाले.
चौथी मुंबई वाढवणजवळ वसवू
मुंबईचा कायापालट केला जात आहे. सध्या मुंबई आणि ‘एमएमआर’ क्षेत्रात विविध विकास प्रकल्पांचे काम वेगाने सुरू आहे. वाढवण बंदराजवळ एक विमानतळ उभारला जाणार आहे. तिसरी मुंबई अटल सेतूजवळ होईल, तर चौथी मुंबई वाढवण बंदराजवळ उभारली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी तिसऱ्या ‘मनी नाईन फायनान्शियल फ्रीडम समिट’मध्ये बोलताना केली.