एसटी कर्मचाऱ्यांचे जूनचे वेतन लांबणीवर; निधी मागणीची फाईल रिजेक्ट झाल्याचा आरोप

कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या आंदोलनाला सरकार जबाबदार राहील, असा इशारा महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचे जूनचे वेतन लांबणीवर; निधी मागणीची फाईल रिजेक्ट झाल्याचा आरोप
Published on

मुंबई : एसटी महामंडळाच्या ८७ हजार कर्मचाऱ्यांचे वेतन अद्यापही रखडले आहे. जून २०२४ या महिन्याचे वेतन देण्यासाठी एसटीकडून राज्य सरकारकडे निधीची फाईल पाठविण्यात आली होती. ती फाईल सरकारने रिजेक्ट केली असल्याचा आरोप महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे. निधीची फाईल रिजेक्ट झाल्याने कर्मचाऱ्यांचे जून महिन्याचे वेतन लांबणीवर गेले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या आंदोलनाला सरकार जबाबदार राहील, असा इशारा महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या दीर्घकालीन संपानंतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाला व खर्चाला कमी पडणारी रक्कम शासन देईल, असे न्यायालयात कबूल करण्यात आले होते. मात्र त्यानंतर परिपत्रक काढताना मात्र एक वर्षच निधी देण्याचे परिपत्रक सरकारने जारी केले. दीर्घकालीन संपानंतर एसटीला खर्चासाठी कमी पडणारी रक्कम सलग चार वर्षे देण्याचा ठराव मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आला. त्यानंतर एप्रिल २०२३मध्ये शासन निर्णय जारी करण्यात आला. त्यानुसार खर्चाला कमी पडणारी रक्कम फक्त तीन महिने देण्यात आली. त्यानंतर फक्त एसटीला देय असलेली सवलत मूल्य रक्कम देण्यात आली आहे. त्यातून वेतन देण्यात आले आहे. मात्र वेतनाला व खर्चाला कमी पडणारी रक्कम कधीच सरकारने दिली नसल्याचा आरोप बरगे यांनी केला आहे.

वेतनासाठी आणखी चार ते पाच दिवसांची प्रतीक्षा

पुरवणी मागण्यामध्ये १८०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. त्यामुळे वेतन मिळेल, पण त्याला चार पाच दिवस लागतील, असा अंदाज बरगे यांनी व्यक्त केला.

logo
marathi.freepressjournal.in