दिल्लीला कांदा पोहोचला अन् लासलगावात दर घसरला; शेतकऱ्यांना पावणेतीन कोटींचा फटका

सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या बफर स्टॉकमधून लासलगाव येथून दिल्लीला ४५३ मेट्रिक टन कांदा पाठवला.
दिल्लीला कांदा पोहोचला अन् लासलगावात दर घसरला; शेतकऱ्यांना पावणेतीन कोटींचा फटका
दिल्लीला कांदा पोहोचला अन् लासलगावात दर घसरला; शेतकऱ्यांना पावणेतीन कोटींचा फटका
Published on

लासलगाव : सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या बफर स्टॉकमधून लासलगाव येथून दिल्लीला ४५३ मेट्रिक टन कांदा पाठवला. दिल्ली एनसीआरमध्ये हा कांदा ३५ रुपये किलो दराने विक्री करण्यास सुरुवात झाल्याने कांद्याचे आगार असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दरात घसरण झाली आहे.

गेले चार दिवस कांद्याच्या दरात टप्प्याटप्प्याने घसरण होऊन ४५० रुपयांची घट झाली. त्याचा थेट फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला. लासलगाव मुख्य बाजारसह उपबाजार विंचूर आणि निफाड आवारावर शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या ७५३३४ क्विंटल कांद्यामागे सुमारे २ कोटी ७६ लाख ९३ हजार २५० रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. केवळ लासलगाव बाजार समिती पुरता हा परिणाम मर्यादित नसून, नाशिक जिल्ह्यातील प्रमुख १५ कांदा बाजार समित्यांमध्ये अंदाजे १० ते १२ कोटी रुपये शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याची बाब समोर आली आहे.

केंद्र सरकारकडून ग्राहकांना दिलासा देण्यासाठी बफर स्टॉकमधील कांदा कमी दरात उपलब्ध करून देण्याच्या निर्णयामुळे ग्राहकांना फायदा होत असला, तरी बाजारातील दर घसरल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.

टप्प्याटप्प्याने घसरण - लासलगाव बाजार समितीत टप्प्या टप्प्याने तीन दिवसात ४५० रुपये प्रति क्विंटल दराने घसरण झाली आहे. त्यामुळे एकट्या लासलगाव बाजार आवारात कांदा उत्पादकांना दोन कोटीहून अधिक आर्थिक फटका बसल्याचा अंदाज आहे.

प्रवीण कदम, कांदा निर्यातदार

logo
marathi.freepressjournal.in