

राजकुमार भगत/उरण
महाराष्ट्रात वन्यजीव पुनर्वसन केंद्रांच्या अभावामुळे वन विभागाने कोकणातील वन्य हत्ती ‘ओंकार’ला पकडून तात्पुरते गुजरातमध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे पर्यावरणप्रेमी, स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठी चिंता व्यक्त होत आहे. याचदरम्यान पुणे जिल्ह्यात झालेल्या बिबट्याच्या हत्येच्या घटनेने मानव-वन्यजीव संघर्ष आणखी गंभीर बनला आहे.
या पार्श्वभूमीवर नॅटकनेक्ट फाऊंडेशनने थेट पंतप्रधानांना याचिका पाठवून मानव-वन्यजीव संघर्षाच्या वाढत्या घटनांवर केंद्राने हस्तक्षेप करून धोरणात्मक फेरबदल करावेत, अशी मागणी केली आहे.
अल्पकालीन आणि फक्त प्रतिक्रियात्मक उपायांवर अवलंबून न राहता वैज्ञानिक आणि दीर्घकालीन धोरण राबविण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने ओंकारला गुजरातमधील ‘वनतारा हत्ती उपचार आणि पुनर्वसन केंद्रात’ तात्पुरते हलवण्यास राज्याला परवानगी दिली आहे. न्यायमूर्ती एम.एस. कर्णिक आणि अजित बी. कडेठाणकर यांच्या खंडपीठाने तज्ज्ञांच्या मूल्यांकनाचा आधार घेत वन विभागाच्या निर्णयाला दुजोरा दिला. तसेच ओंकारला महाराष्ट्रामध्ये परत आणण्याच्या राज्य सरकारच्या आश्वासनाची नोंद न्यायालयाने घेतली. पर्यावरणवाद्यांचे मत असे की, या उपाययोजना तातडीने न केल्यास मानव-वन्यजीव संघर्ष आणखी बळावेल आणि ‘ओंकार’सारखी प्रकरणे पुन्हा पुन्हा घडत राहतील.
ओंकार हा मुक्तपणे राहणारा वन्य हत्ती असल्याने त्याला नैसर्गिक अधिवासातच राहू द्यावे, असा आग्रह धरला आहे. त्याला परिचित क्षेत्रापासून दूर खाजगी कुंपणात ठेवणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. राधानगरी, चांदोली, तिलारीसारख्या राज्यातील पर्यायांना प्राधान्य द्यावे, अशी आमची मागणी आहे.
- रोहित प्रकाश कांबळे, याचिकाकर्ते , रत्नागिरी
“ओंकारचे स्थलांतर आणि पुण्यातील बिबट्याची हत्या या वेगळ्या घटना नसून संपूर्ण व्यवस्थेतील त्रुटी दाखवणाऱ्या आहेत. केवळ पकडणे किंवा हत्या करणे ही लक्षणांवर उपचार करणारी भूमिका आहे. भारताला वैज्ञानिक, कॉरिडॉर-आधारित वन्यजीव धोरणाची तातडीने आवश्यकता आहे.”
- बी. एन. कुमार, संचालक नॅटकनेक्ट फाऊंडेशन
ओंकार कर्नाटकातून महाराष्ट्रात भरकटून आल्यानंतर तो प्रशासकीय अधिवासांमध्ये अडकला आहे. महाराष्ट्रात पुनर्वसन केंद्र नसणे आणि शेजारील राज्यांनी नकार दिल्याने स्थलांतर अपरिहार्य ठरल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सावंतवाडीतील ग्रामस्थांनीही ओंकारला पूर्णपणे दूर न करता, महाराष्ट्र–कर्नाटक हत्ती कॉरिडॉरमार्गे परत नेण्याची मागणी केली आहे.
- मंदार गावडे, अभ्यासक वन्यजीव कुडाळ