लोकशाही संपवण्याच्या दिशेने पाऊल मानायचे का? राहुल नार्वेकरांच्या नियुक्तीवर 'उद्धव ठाकरेंचे टीकास्त्र'

राहुल नार्वेकरांची नेमणूक हे देशातील लोकशाही संपवण्याच्या दिशेने टाकलेले पुढचे पाऊल मानायचे का? असा सवाल त्यांनी केला आहे.
लोकशाही संपवण्याच्या दिशेने पाऊल मानायचे का? राहुल नार्वेकरांच्या नियुक्तीवर 'उद्धव ठाकरेंचे टीकास्त्र'

मुंबई : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पक्षांतर बंदी कायदा समितीच्या अध्यक्षपदी महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची नियुक्ती केली आहे. राहुल नार्वेकर यांच्या नेमणुकीवर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. राहुल नार्वेकरांची नेमणूक हे देशातील लोकशाही संपवण्याच्या दिशेने टाकलेले पुढचे पाऊल मानायचे का? असा सवाल त्यांनी केला आहे. आमदार अपात्र प्रकरणात नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाविरोधात शिवसेना सर्वोच्च न्यायालयात गेली असताना ही नेमणूक करणे म्हणजे सर्वोच्च न्यायालयावरच दडपण आणण्याचाच प्रयत्न समजावा लागेल, असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पक्षांतर बंदी कायदा समितीच्या अध्यक्षपदी महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नेमणुकीची घोषणा केली आहे. त्यांच्या नेमणुकीवर उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला असून हे लोकशाही संपण्यासाठीचे पुढले पाऊल मानायचे का? असा सवाल उपस्थित केला आहे. महाराष्ट्रात नुकताच राज्यघटनेच्या परिशिष्ट दहाच्या चिंधड्या उडवून जो उफराटा निर्णय नार्वेकरांनी दिला त्याचे वस्त्रहरण आम्ही जनतेच्या न्यायालयात तर केले आहेच, पण त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयातही गेलो आहोत. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असताना ही नेमणूक करणे म्हणजे सर्वोच्च न्यायालयावर दडपण आणण्याचाच प्रयत्न समजावा लागेल, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

आम्ही सर्वोच्च न्यायालयाहून मोठे आहोत, आम्ही म्हणू तेच संविधान आणि म्हणू तोच कायदा, यापुढे देशात असेल असे म्हणणारे कोणीही असले तरी त्याला डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाची आणि लोकशाहीची ताकद दाखवावीच लागेल. अन्यथा देशात लोकशाहीची हत्या होऊन बेबंदशाही येईल, असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in