
जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी उद्या (दि.२०) देहूनगरीतून प्रस्थान करणार आहे. या पालखीचे यंदाचे ३३७ वे वर्ष आहे. यंदा कोरोना ओसरल्याने पायी वारी होतेय. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय. मात्र, पावसाने ओढ दिल्याने चिंतेचे वातावरणही निर्माण झाले आहे.
देहूनगरीत वारकऱ्यांची लगबग सुरु झाली आहे. २० जूनला पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणार असल्याने देवस्थान ही सज्ज झाले आहे. गेली दोन वर्ष कोरोनामुळे या वारकऱ्यांना ना देहूत, ना विठूरायाच्या पंढरीत जाता आलं. शासनाच्या निर्बंधांमुळे पायी वारीत खंड पडला आणि पालखी मंदिरातच मुक्कामी राहिली. आषाढी एकादशीला फक्त पादुकाच विठूरायाच्या भेटीला गेल्या होत्या. म्हणून यंदा वारकरी गेल्या दोन वर्षांची कसर भरून काढायला सज्ज झाला आहे. हा ३३७ वा सोहळा 'न भूतो, न भविष्यते' असा पार पडेल. सोमवारच्या प्रस्थानानंतर पाऊस कृपादृष्टी दाखवेल अन् वारकऱ्यांच्या पेरण्या उरकतील. प्रस्थानाला थोडी गर्दी कमी असेल पण पुण्याच्या बाहेर पालखी पडताच वारकऱ्यांचा अलोट पहायला मिळेल. असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
सोमवारी दुपारी अडीच वाजता पालखी प्रस्थान सोहळा पार पडेल. पहिला मुक्काम हा देहूतील मुख्य मंदिरामागे असणाऱ्या ईनामदार वाड्यात असेल. तिथून पालखी आकुर्डी, पुणे, लोणी मार्गे, बारामती मार्गे २ जुलैला इंदापूरला पोहचेल. मग तिथून अकलूज, पिराची कुरोली मार्गे ८ जुलैला वाखरीत मुक्काम करेल. पंढरपूरच्या संत तुकाराम महाराज मंदिरात ९ जुलैला मुक्काम आणि १० जुलैला आषाढी एकादशी दिवशी विठूरायाची भेट घडेल.