माहूर गडावर रेणुकादेवीची घटस्थापना उत्साहात
नांदेड : महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्णपीठ असलेल्या माहूर गडावरील श्री रेणुकादेवीची घटस्थापना रविवारी (दि. १५) मोठ्या उत्साहात करण्यात आली. संस्थानचे अध्यक्ष तथा नांदेडचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश नागेश न्हावकर यांनी सपत्नीक घटस्थापना करून महाआरती केली.
यावेळी संस्थानचे सचिव तथा सहाय्यक जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन सहपरिवार उपस्थित होते. रविवारी सकाळी नऊ वाजता श्री रेणुकादेवीच्या घटस्थापनेच्या विधिवत पूजा अभिषेक विधी सुरुवात झाली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी दादासाहेब शिनगारे सपत्नीक उपस्थित होते. श्री रेणुकादेवी मंदिराच्या समोर कुमारिका पूजन व सुहासिनी पूजन अध्यक्ष/सचिव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. दुपारी बारा वाजता घटस्थापनेची महाआरती करण्यात आली.
यावेळी विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय कानव, आशिष जोशी, बालाजी जगत, दुर्गादास भोपी, अरविंद देव, व्यवस्थापक योगेश साबळे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.