Ajit Pawar Death : 'दादा' गेले; महाराष्ट्र हळहळला! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती येथे विमान अपघातात मृत्यू

अजितदादांच्या अकस्मात जाण्याने केवळ बारामतीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून ‘दादा’माणूस गमावला असल्याच्या भावना अगदी सर्वसामान्य माणसापासून राजकीय नेत्यांनी व्यक्त केल्या.
Ajit Pawar Death : 'दादा' गेले; महाराष्ट्र हळहळला! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती येथे विमान अपघातात मृत्यू
Published on

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा बुधवारी सकाळी बारामती येथे भीषण विमान अपघातात मृत्यू झाला. आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपल्या बालेकिल्ल्यात म्हणजेच बारामतीमध्ये आयोजित केलेल्या चार जाहीर सभांना संबोधित करण्यासाठी ते मुंबईहून पहाटे विमानाने निघाले होते. मात्र, बारामती येथे सकाळी ८.४५ च्या सुमारास त्यांच्या विमानाला धावपट्टीवर उतरण्यापूर्वीच भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत अजित पवारांसह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अजितदादांच्या निधनामुळे केवळ भाजप-नेतृत्वाखालील राज्यातील आघाडी सरकारमध्येच पोकळी निर्माण झाली नाही, तर त्यांनी नेतृत्व केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (एनसीपी) भवितव्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अजितदादांच्या अकस्मात जाण्याने केवळ बारामतीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून ‘दादा’माणूस गमावला असल्याच्या भावना अगदी सर्वसामान्य माणसापासून राजकीय नेत्यांनी व्यक्त केल्या. या विमानात अजित पवार यांच्यासह कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक, अजित पवार यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव, फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी हे प्रवास करत होते. त्यांचाही या अपघातात मृत्यू झाला.

दरम्यान, अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरुवारी त्यांच्या कर्मभूमीत, बारामती येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा हे बारामतीत येऊन अजित पवार यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेणार आहेत. तत्पूर्वी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी बारामतीत येऊन दादांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले, तर राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

विमान धावपट्टीच्या बाजूला आदळून स्फोट झाला

अजित पवार हे ५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंबईहून बारामतीला जाहीर सभांना संबोधित करण्यासाठी ‘लिअर जेट’ (VT- CRA) या खासगी विमानाने जात होते. फ्लाइट रडारच्या माहितीनुसार, या विमानाने सकाळी ८.१० वाजता मुंबईहून उड्डाण केले. मात्र सकाळी ८.४५ च्या सुमारास विमानाचा रडारशी संपर्क तुटला आणि सकाळी ८.४८ वाजता बारामती विमानतळाच्या धावपट्टी क्रमांक ११ च्या अगदी सुरुवातीला ते कोसळले. यावेळी विमान धावपट्टीवर आदळताच त्याचे दोन तुकडे झाले आणि भीषण आग लागली. बारामती विमानतळाचे व्यवस्थापक शिवाजी तावरे यांनी सांगितले की, विमान उतरण्याचा प्रयत्न करत असताना धावपट्टीच्या एका बाजूला जाऊन आदळले आणि मोठा स्फोट झाला. हे विमान मुंबईहून भाड्याने घेण्यात आले होते. अपघाताची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले, मात्र आगीची तीव्रता एवढी मोठी होती की कोणालाही वाचवणे शक्य झाले नाही.

कार्यकर्ते, नागरिक धाय मोकलून रडले

अपघाताची बातमी समजताच बारामतीकरांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे धाव घेतली. अनेक कार्यकर्ते आणि नागरिक धाय मोकलून रडत होते, तर काही जण एकमेकांच्या गळ्यात पडून हमसाहमशी रडताना दिसले. संकटाच्या काळात एखाद्या मोठ्या भावासारखा खंबीरपणे पाठीशी उभा राहणारा आपला थोरला भाऊ आज आपल्यात नाही, ही भावना बारामतीकरांना अस्वस्थ करून सोडणारी ठरली. सन १९९१ पासून अजित पवार यांनी बारामती लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करत या परिसराचा कायापालट करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले होते. केवळ बारामतीच नव्हे, तर पुणे जिल्हा आणि पिंपरी-चिंचवडच्या राजकारणावरही त्यांची मजबूत पकड होती.

दादांना मुख्यमंत्री झालेले पाहायचे होते : चाहत्यांच्या भावना

अजितदादांच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि बारामती तालुक्यातील दुकाने, बाजारपेठा बंद करण्यात आल्या. सोमेश्वर, पणदरे, सुपा, शिर्सुफळ आदी गावांमधून बारामतीकडे जाण्यासाठी नागरिकांची रिघ लागली होती. दादा इतक्यात जाऊच शकत नाहीत, अजून बरेच काम बाकी आहे. अजितदादांना मुख्यमंत्री होताना पहायचे होते. नियतीने असा अचानक घाला घातला, अशी भावना बारामतीकारांनी व्यक्त केली. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, पदाधिकारी, तसेच अजितदादांवर प्रेम करणाऱ्या बारामतीकरांना त्यांच्या निधनाच्या बातमीवर विश्वासच बसत नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. नक्की काय झाले, याची स्वतःच्या डोळ्यांनी खात्री करण्यासाठी गावागावांतून हातातील कामे सोडून बारामतीकर घटनास्थळी जमले होते, तर परिस्थिती नियंत्रणात राहावी म्हणून प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत होती.

विमान कंपनी आणि मॉडेलचा वादग्रस्त इतिहास

या दुर्घटनेनंतर ‘व्हीएसआर व्हेंचर्स’ कंपनी आणि लिअरजेट या विमानांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेष म्हणजे, सप्टेंबर २०२३ मध्ये याच कंपनीच्या एका विमानाचा मुंबई विमानतळावर धावपट्टीवरून घसरून अपघात झाला होता. त्यावेळी सुदैवाने जीवितहानी झालेली नव्हती, मात्र दोन वर्षांच्या अंतरात एकाच कंपनीच्या दोन विमानांचा महाराष्ट्रात अपघात होणे ही चिंतेची बाब ठरली आहे. याशिवाय, ‘लिअरजेट ४५’ या मॉडेलचा जागतिक इतिहासही अशुभ राहिला आहे. मेक्सिकोमध्ये २००८ आणि २०२१ मध्ये अशाच प्रकारच्या विमानांचे भीषण अपघात झाले होते, ज्यात तिथल्या गृहमंत्र्यांसह अनेकजणांना प्राण गमवावे लागले होते, तर २००३ मध्ये इटलीमध्येही याच मॉडेलचा अपघात झाला होता.

बालपण व शिक्षण

अजित पवार यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील काटेवाडी आहे. मात्र त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली (प्रवरा) या त्यांच्या आजोळच्या गावी झाला. त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण तेथेच झाले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी अजित पवार मुंबईत आले, शिक्षण पूर्ण करून बारामतीला आले आणि तेथील सहकारी संस्थांमधून त्यांनी सामाजिक व राजकीय कार्याला सुरुवात केली.

कारकीर्दीला सुरुवात

अजित पवार यांनी १९८२ साली राजकारणात प्रवेश केला. त्याचवर्षी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर त्यांची निवड झाली. पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी १९९१ साली त्यांची निवड झाली. १६ वर्षं ते त्या पदावर होते.

राजकीय प्रवास

अजित पवार हे भाजप-शिवसेना (एकनाथ शिंदे) यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये सहाव्यांदा राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत होते. तसेच ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात ज्येष्ठ नेते आणि त्यांचे काका शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली केली होती. १९९१ पासून त्यांनी बारामती विधानसभा मतदारसंघाचे सलग सात वेळा प्रतिनिधित्व केले आणि प्रत्येक निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवून आपले वर्चस्व सिद्ध केले. त्यांचे राजकीय सामर्थ्य प्रामुख्याने महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात रुजलेले होते. तब्बल १६ वर्षे त्यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले, ज्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखाने आणि दूध संघांवर त्यांची मोठी पकड होती. आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत त्यांनी जलसंपदा, ऊर्जा आणि ग्रामविकास यांसारखी महत्त्वाची मंत्रिपदे भूषवली होती. विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांसारख्या विविध मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला होता. अजित पवार हे त्यांच्या धाडसी आणि कधी कधी वादग्रस्त निर्णयांसाठी नेहमीच चर्चेत राहिले.

पहाटे घेतलेली शपथ हा सर्वात मोठा धक्का

देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत नोव्हेंबर २०१९ मध्ये त्यांनी पहाटे घेतलेली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ हा महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा धक्का मानला जातो, जरी तो प्रयोग केवळ ८० तास टिकला होता. त्यानंतर जुलै २०२३ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पाडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सामील होण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. या निर्णयामुळे त्यांनी शरद पवारांच्या २५ वर्षांच्या नेतृत्वाला थेट आव्हान दिले होते. निवडणूक आयोगाने देखील त्यांच्या गटालाच राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून मान्यता दिली आणि पक्षाचे नाव व चिन्ह त्यांना बहाल केले.

मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न अधुरेच

विक्रमी सहा वेळा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचा मान अजित पवारांना मिळाला, मात्र राज्याचे मुख्यमंत्री होण्याचे त्यांचे स्वप्न अखेरपर्यंत अधुरेच राहिले. त्यांनी १० नोव्हेंबर २०१० रोजी पहिल्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर २०१२ ते २०१४ दरम्यान त्यांनी दुसऱ्यांदा हे पद भूषवले. नोव्हेंबर २०१९मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या पहाटेच्या शपथविधीवेळी ते तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री झाले, तर त्यानंतर लगेचच महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी चौथ्यांदा या पदाची शपथ घेतली. जुलै २०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर ते पाचव्यांदा आणि डिसेंबर २०२४ मध्ये महायुती सरकार सत्तेत आल्यावर सहाव्यांदा उपमुख्यमंत्री बनले.

मुख्यमंत्री होण्याची संधी तीन वेळा हुकली

अजित पवारांना मुख्यमंत्री होण्याची संधी तीन वेळा अतिशय जवळून हुकली होती. २००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला असतानाही ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपद काँग्रेसला देण्याचा निर्णय घेतल्याने त्यांची पहिली संधी हुकली. त्यानंतर २०१९ मधील पहाटेच्या शपथविधीनंतर अवघ्या ८० तासांत सरकार कोसळल्याने त्यांना दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावे लागले. पुढे २०२२ मधील सत्तांतरानंतर आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतरही ते मुख्यमंत्री होतील अशा चर्चा होत्या, परंतु एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद कायम राहिल्याने तिसऱ्यांदाही त्यांचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.

प्रशासनावर मजबूत पकड असलेला नेता

अजितदादा यांच्या प्रशासकीय कामाचा प्रचंड उरक आणि कार्यपद्धतीमुळे सनदी अधिकाऱ्यांमध्ये त्यांच्याबद्दल मोठा आदर होता. कोणत्याही फाइलवर त्वरित निर्णय घेणे आणि विकासकामांना गती देणे ही त्यांची ओळख होती. अजितदादा हे त्यांच्या शिस्तप्रिय, वक्तशीर आणि विकासकामांना गती देणाऱ्या प्रशासकीय कार्यपद्धतीसाठी प्रसिद्ध होते. पहाटे कामाला लागणारा नेता अशी ओळख असलेले दादा, जलसंपदा व ऊर्जा क्षेत्रातील निर्णयांसाठी, तसेच अर्थमंत्री म्हणून बारकाईने आर्थिक नियोजनासाठी ओळखले जात. ते स्पष्टवक्ते, कामात तत्परता मानणारे आणि प्रशासनावर मजबूत पकड ठेवणारे लोकनेते होते.

अजितदादांच्या कार्यपद्धतीची प्रमुख वैशिष्ट्ये

अजितदादा यांच्या कार्यपद्धतीत विकास, शिस्त आणि काम पूर्ण करण्याच्या ध्येयाला सर्वोच्च प्राधान्य होते.

  • वक्तशीरपणा आणि शिस्त : सकाळी लवकर उठून कामाला लागणे, सभांना वेळेवर उपस्थित राहणे आणि सरकारी कामांमध्ये दिरंगाई खपवून न घेणे, ही त्यांची मुख्य ओळख होती.

  • वेगवान प्रशासन : फाइल कामांचा निपटारा तातडीने व्हावा, यावर त्यांचा भर होता. प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून काम काढून घेण्याची हातोटी त्यांच्याकडे होती.

  • विकासाची दृष्टी : पायाभूत सुविधा, सिंचन प्रकल्प आणि शहर विकासावर त्यांचा विशेष भर असे. बारामती आणि पिंपरी-चिंचवडच्या विकासात त्यांनी मोठे योगदान दिले आहे.

  • स्पष्टवक्तेपणा : कामाच्या संदर्भात स्पष्ट भूमिका मांडणे, काम होणार असेल तर हो आणि नसेल तर स्पष्टपणे नाही, असे सांगण्याची त्यांची पद्धत होती.

  • जनता दरबार व थेट संवाद : सत्तेत असताना किंवा नसतानाही ते जनतेच्या संपर्कात राहण्यासाठी जनता दरबार भरवत, तसेच कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत.

  • आर्थिक शिस्त : राज्याचे अर्थमंत्री म्हणून बजेट तयार करताना ते काटकसरीवर आणि विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्यावर भर देत.

तपासाची सूत्रे डीजीसीए, एएआयबीकडे

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर या घटनेच्या चौकशीची सूत्रे आता नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) तसेच एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोकडे (एएआयबी) सोपवण्यात आली आहेत. डीजीसीएने या अपघाताबाबत अद्याप कोणालाही समन्स बजावलेले नाही. एएआयबीकडून तपास प्रक्रिया अधिकृतपणे सुरू करण्यात आली असून या प्रकरणातील प्रत्येक बाब सखोलपणे तपासली जाणार आहे. तपास ब्युरोची एक टीम अपघातस्थळाची पाहणी करण्यासाठी दिल्लीहून बारामतीला रवाना झाली आहे. दरम्यान, एएआयबीच्या पथकाने विमान कंपनीची मालकी असलेल्या व्हीआरएस कार्यालयात चार तास कारवाई करत महत्त्वाचे कागदपत्रे ताब्यात घेतली.

विमान अपघाताची चौकशी होणार -एकनाथ शिंदे

या विमान अपघातात आमचे जवळचे सहकारी गेले आहेत. अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी अपघातामागील कारणांची सखोल चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे. या अपघातात ५ लोकं मृत्यूमुखी पडलेले आहेत. त्यामुळे या विमान अपघाताची चौकशी नक्कीच व्हायला पाहिजे आणि चौकशी नक्कीच होईल. या पुढेदेखील अशाप्रकारचे अपघात होता कामा नये, यासाठी ते गरजेचे आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

बारामतीसह सासरवाडी तेर आणि बीड जिल्ह्यात कडकडीत बंद

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा भारत बारामती येथे विमान अपघातात मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर बारामतीसह राज्यातील विविध ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. बारामतीतील विविध आस्थापना तसेच संस्था बंद करण्यात आल्या. अजित पवार यांचे मूळ गाव काटेवाडीत एकही चूल पेटली नाही. गावातील एका तरुणाचे लग्न केवळ धार्मिक विधी करून उरकण्यात आले. अजित पवारांची सासरवाडी असलेल्या धाराशिवच्या तेर गावात संपूर्ण गाव बंद ठेवत सार्वजनिक दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. अजित पवार यांच्या जाण्याने त्यांचं आजोळ असलेल्या अहिल्यानगरच्या देवळाली प्रवरा मध्येही शोकाकुल वातावरण आहे. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवारांच्या निधनानंतर बीड जिल्ह्यातील बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत.

जनतेमधला नेता गेला…

महाराष्ट्राने आज आपला एक धडाडीचा, जनतेतला नेता गमावला. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचे बुधवारी सकाळी विमान अपघातात अकाली निधन झाले. चार दशकांहून अधिक काळ राज्याच्या विकासासाठी झटणारा, कार्यकर्त्यांच्या प्रश्नांसाठी तत्पर असलेला आणि सामान्य जनतेच्या प्रत्येक अडचणीला मानाने ऐकणारा दादा आता आपल्या सोबत नाही. त्यांच्या अकाली जाण्याने राज्याच्या राजकारणात आणि समाजात रिक्तपण निर्माण झाले असून, पवार कुटुंबीयांपासून नागरिकांपर्यंत सर्वत्र शोककळा पसरली आहे.

❝ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे असे अपघाती निधन होणे, हे धक्कादायक आणि वेदनादायी आहे. महाराष्ट्राबरोबर महाराष्ट्रातील राजकारणातले कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून काम कसे करून घ्यायचे, याची शैली त्यांच्याकडे होती. एक मजबूत पकड, जरब असा दरारा दादांचा प्रशासनावर होता. काम होणार असेल तर हो म्हणायचे, नसेल तर नाही, असे स्पष्ट होते. कामाच्या बाबतीत शिस्तप्रिय होते. कार्यकर्त्याच्या पाठीशी कसे उभे रहायचे याचे उत्तम उदाहरण ते होते. राजकारणातले उमदं असे नेतृत्व आपल्यातून गेले आहे. अत्यंत दु:खद अशी घटना घडली आहे.

- संजय केळकर, आमदार, ठाणे शहर (भाजप)

❝ स्पष्टवक्तेपणा, निर्णयक्षमता आणि जनसामान्यांच्या प्रश्नांबाबत असलेली तळमळ ही त्यांच्या नेतृत्वाची खरी ओळख होती. ‘दादा’ हे अनेक पिढ्यांचे मार्गदर्शक होते. राजकारणात पदे येतात-जातात, मात्र जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारी व्यक्तिमत्त्वे विरळाच असतात. अजितदादा पवार हे त्यापैकीच एक होते. महाराष्ट्राच्या सामाजिक-राजकीय वाटचालीत त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील. त्यांच्या जाण्याने राज्याने एक कर्तृत्ववान नेता आणि समाजाने एक आपला माणूस गमावला आहे.

-संजीव नाईक, माजी खासदार

❝ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या निधनाची बातमी मनाला सुन्न करणारी असून, संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही कधीही न भरून येणारी हानी आहे. दादा म्हणजे प्रचंड कामाचा झपाटा, निर्णयक्षम नेतृत्व आणि जमिनीशी घट्ट जोडलेला नेता. जनतेच्या प्रश्नांबाबत त्यांची तळमळ, स्पष्ट भूमिका आणि धाडसी निर्णयक्षमता यामुळे ते राज्याच्या राजकारणातील आणि समाजकारणातील एक प्रभावी पर्व ठरले.

- संदीप नाईक, माजी आमदार

❝ प्रशासनावरील पकड आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास असलेले एक धडाडीचे नेतृत्व आपल्यातून हरपले आहे. सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री पद भूषवण्याचा विक्रम प्रस्थापित करणाऱ्या दादांनी सिंचन, ऊर्जा आणि वित्त अशा महत्त्वाच्या विभागांतून महाराष्ट्राच्या प्रगतीला नवी दिशा दिली. त्यांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणातील एक 'शिस्तबद्ध आणि कार्यतत्पर' अध्याय संपला आहे. ही पोकळी कधीही भरून निघणारी नाही.

- निरंजन डावखरे, आमदार, कोकण पदवीधर

❝ उपमुख्यमंत्री अजित पवार हे महाराष्ट्रातील मोठे नेते होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राला मोठे नुकसान झाले आहे. दादाच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा विकास जोरात सुरू होता. त्यांच्या अकाली निधनाने संपूर्ण राज्य धोरका झाल्यासारखे झाले आहे. हे दु:खद असून त्यांच्या जाण्याने सर्वत्र मोठे दुःख व्यक्त केले जात आहे.

- अतुल सावे, बहुजन कल्याण मंत्री

❝ महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनावर शोककळा पसरवणारी अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या दु:खद घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र शोककळा पसरली आहे. भावना व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडत आहेत. अजित पवार हे महाराष्ट्रातील एक अनुभवी आणि लोकाभिमुख नेते होते. त्यांच्या निधनाने राज्याची राजकीय व्यस्था आणि प्रशासन दोन्हीच धक्क्यात आहेत, आणि त्यांच्या जाण्यामुळे मोठी रिकामी जागा निर्माण झाली आहे.

- राजाभाऊ ठाकूर

❝ माझा राजकीय प्रवास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाला. जिल्हा परिषद सदस्य आणि पहिली आमदारकीची निवडणूकही त्यांनी माझ्या बाजूने मार्गदर्शन करून लढविली. आज, मी आमदार आहे, परंतु दादांची अचानक एक्झीट झाली ही दुर्दैवी घटना आहे. दादांच्या निधनाची बातमी कळताच मला प्रचंड धक्का बसला. ‘माझी आमदारकीची सुरुवात आणि दादांची…’ एवढे शब्द बोलताच मला अश्रू अनावर झाले. थोडा वेळ दुःख आवरत, मी म्हणाल्या, आजचा काळा दिवस आहे. जे घडले त्यावर विश्वास बसत नाही; दादा आपल्यात नाहीत ही कल्पनाही सहन करण्याची नाही. माझी राजकीय सुरुवात झाली आणि दादांची एक्झिट ही अत्यंत दुःखद घटना आहे.

- आ. अनुराधा चव्हाण, छत्रपती संभाजीनगर, फुलंब्री तालुका, भाजप

❝ दादा गेले, हे कळताच मोठा धक्का बसला. या घटनेवर विश्वास बसत नव्हता. टीव्ही पाहत असताना मन कोसळले. विलासराव देशमुख गेल्यानंतर राजकीयदृष्ट्या पोरका झालेल्या माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आश्रय देणारा पहिला नेता अजित पवार होते. दुसऱ्या वेळेस राजकीय अडचणीच्या काळात विधानसभेची उमेदवारी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार केले. कडक शिस्तीच्या दादांचे मन मृदू असल्याचा अनुभव मला मिळाला. पवार कुटुंबावर कोसळलेले दु:खाचे डोंगर सहन करण्याची शक्ती परमेश्वराने द्यावी. दादांच्या आत्म्यास शांती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

- प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार, लोहा-कंधार जि. नांदेड

❝ कानावर आणि मनावर विश्वास न बसणाऱ्या या बातमीने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मोठा हादरा बसला आहे. दादांसोबत अनेकवेळा विकासात्मक चर्चांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. अजितदादांना सतत महाराष्ट्राच्या विकासाची चिंता होती. सर्वसामान्यांचे हित हा अजितदादांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू होता. त्यामुळे जमिनीवर राहून काम करणारा महान नेता आज महाराष्ट्राने गमावला आहे. सह्याद्रीच्या कुठल्याही शिखरापेक्षा उंच असलेले अजित पवार, महाराष्ट्राचे सर्वाधिक कालावधीसाठी उपमुख्यमंत्री म्हणून इतिहासात राहतील. त्यांच्या कुटुंबीयांना सावरण्याचे बळ ईश्वर देवो. अजित पवारांच्या आत्म्यास चिरशांती मिळो हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली. ओम शांती शांती…!

- डॉ. अजित माधवराव गोपछडे, खा. संसद सदस्य, राज्यसभा, महाराष्ट्र

❝ अजित पवार… सुमारे चार दशकांच्या कठोर मेहनतीने उभे राहिलेले नेतृत्व एका क्षणात आपल्यातून गेले. शब्दाला जागणारे, प्रशासनावर उत्तम पकड असलेले आणि तळागाळातील लोकाशी घट्ट जोडलेले एक उत्तुंग नेतृत्व आज अजितदादांच्या रूपाने महाराष्ट्राने गमावले आहे. ही हानी पवार कुटुंबीयांसह संपूर्ण महाराष्ट्राची आहे. या दुःखद क्षणात आम्ही सर्वजण पवार कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत.

- अंबादास दानवे, माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते

❝ काही दिवसांपूर्वीच दादांशी बोलण्याची संधी मिळाली होती. वसई-विरारच्या विकासासाठी शासनाची मदत लागेल असे सांगताच दादांनी म्हणाले ‘शंभर टक्के करणार. या निवडणुकीत महाराष्ट्रभर राजकीय पक्षांची पीछेहाट झाली असताना, आपण गड राखला, म्हणून दादांनी भरभरून दाद दिली. राजकारणापलीकडील दिलेर माणूस, शब्दाने परखड पण तितकेच प्रेमळ, आपल्या कारकीर्दीत प्रभाव सोडून गेलेल्या नेत्यांपैकी एक प्रमुख नेता म्हणजे दादा होय. दादांच्या अकाली जाण्याने एक मोठा आधार हरपला आणि आपल्या कुटुंबातील कुणीतरी गेल्याचं दुःख आम्हाला अनुभवायला लागत आहे. संपूर्ण राज्याला हादरवून टाकणारी ही दुर्दैवी घटना आहे. अजितदादांशी विधानसभागृहातील आणि विविध विकासकामांच्या निमित्ताने आलेल्या संपर्कांची आठवण आणि त्यांचा स्नेह आठवताना मला अश्रू अनावर झाले. महाराष्ट्राला अजून काही वर्षे दादा हवा होता.

- हितेंद्र ठाकूर, अध्यक्ष बहुजन विकास आघाडी

❝ राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनाने महाराष्ट्राने एक कणखर, अनुभवी आणि विकासाभिमुख नेतृत्व गमावले आहे. अजित पवार यांचे निधन ही अत्यंत धक्कादायक, वेदनादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना आहे. विरोधकांनाही आदराने वागवणारे अशी ओळख असलेले अजित हे बारामतीचे किल्लेदार म्हणून केवळ आपल्या मतदारसंघापुरते मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत होते. या दुःखद घटनेमुळे राज्याच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पवार कुटुंबीयांना आणि त्यांच्या असंख्य समर्थकांना हे अपार दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून मी अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

- गुलाबराव पाटील, पालकमंत्री

❝ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन ही घटना आपल्या सर्वांसाठी अत्यंत दुःखद व धक्कादायक आहे. धाडसी, कर्तृत्ववान आणि उमदा नेता आपण गमावला आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. एमजीएम परिवाराच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

- अंकुशराव कदम, कुलपती, एमजीएम विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर

❝ अजितदादाची एक्झिट अतिशय धक्कादायक होती. त्यांच्या जाण्याने कामाचा प्रचंड आवाका असणारा महाराष्ट्राच्या राजकारणातील धुरंदर ‘दादा’ गेला. सत्ताधारी, विरोधक आणि प्रशासनावर प्रचंड पकड असणारे महाराष्ट्रातील सडेतोड नेतृत्व आपल्यातून हरपले. आगामी राजकारणात त्यांची उणीव सातत्याने जाणवत राहणार आहे.

- संदीप देसाई, प्रदेश संघटक, आम आदमी पार्टी महाराष्ट्र

❝ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने मोठा धक्का बसला आहे. अजित पवार हे मोठे नेते होते आणि सर्वसामान्यांच्या कामासाठी सदैव तत्पर होते. ते समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या प्रश्नांबाबत काळजी घेत, योग्य निर्णयासाठी विचार करीत असत. त्यांच्या अकाली निधनामुळे राज्याला मोठे नुकसान झाले आहे. शिवसेनेकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जाते.

- आ. प्रदीप जैस्वाल, शिवसेना

❝ महाराष्ट्राचे लाडके दादा आज आपल्यात नाहीत, यावर विश्वास बसत नाही. त्यांच्या निधनाची बातमी मनाला चटका लावून जाणारी आहे. प्रशासकीय कामातील शिस्त, कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची वृत्ती आणि विकासाची दूरदृष्टी असलेला एक कार्यसम्राट लोकनेता आज आपण गमावला आहे. विमान अपघाताची ही हृदयद्रावक घटना केवळ एका कुटुंबाची नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राची हानी आहे. अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली!

- आ. संजय केणेकर

❝ सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांची जाण असलेला नेता, शब्दाला पक्का असलेला नेता म्हणजे अजितदादा पवार. विमान अपघाताची बातमी ऐकून धक्का बसला. तरुणांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व असणारा, देशासाठी खंबीर नेतृत्व असलेला नेता आपण गमावला.

- निलेश राऊत, सचिव यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान

❝ उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान दुर्घटनेत निधन झाले. यावर विश्वास बसत नसून ही घटना मनाला धक्का देणारी आहे. स्पष्टवक्ता, नियमात बसणाऱ्या गोष्टी करणारा नेता म्हणून उपमुख्यमंत्री पवार यांची संपूर्ण महाराष्ट्राला ओळख होती. मी अडची वर्षे वित्त विभागाचा राज्यमंत्री असताना त्यांच्या सोबत अनेक बैठकांमध्ये सहभागी होतो. अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी महाराष्ट्रातील सर्व घटकांना न्याय देत पाहिजे, ही त्यांची भूमिका राहील. माझी व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राजकारणापलीकडची मैत्री होती. त्यांच्या जाण्याने अत्यंत दु:ख झाले. पाटण विधानसभा मतदारसंघाचा आमदार व सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी श्रद्धांजली अर्पण करतो.

- शंभूराज देसाई, पालकमंत्री सातारा

....................................................

आमचा आधारस्तंभ हरपला

❝ उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने आमचा आधारस्तंभ हरपला आहे. गेली अनेक वर्षे मी त्यांच्यासोबत काम केले. दादांच्या निधनाने राजकारणातील एक कुशल प्रशासक, कठोर निर्णय घेण्याची क्षमता असलेले आणि ग्रामीण भागाशी घट्ट नाळ जोडलेले नेतृत्व आपण गमावले आहे.

- प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे नेते

ते माझ्या कुटुंबाचे आधारवड होते !

❝अजितदादा हे केवळ माझे नेते नव्हते, तर ते माझ्या कुटुंबाचे आधारवड होते. माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण आणि संघर्षाच्या काळात, दादा माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या पाठीशी ढाल बनून खंबीरपणे उभे राहिले. त्यांनी दिलेली ती साथ मी कधीही विसरू शकणार नाही. एक कर्तव्यदक्ष आणि शब्दाला पक्का असणारा लोकनेता आपण गमावला आहे.

- नवाब मलिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते

लोकाभिमुख नेतृत्व गमावले

❝ स्पष्टवक्तेपणा, प्रशासनावर मजबूत पकड, जनतेच्या प्रश्नांची सखोल जाण आणि ते सोडवण्याची क्षमता असलेल्या अजित दादा पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राने धडाडीचे कर्तबगार व लोकाभिमुख नेतृत्व गमावले आहे. त्यांना राजकारणाचे बाळकडू त्यांचे काका, ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्याकडून मिळाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत अजितदादांनी राजकारणात स्वतःचा वेगळा ठसा उमटवला. कामाच्या बाबतीत ते अत्यंत स्पष्ट, वक्तशीर, कणखर आणि निर्णयक्षम भूमिका घेत असत. कोणत्याही पक्षातील कार्यकर्ता असो, त्याच्या मदतीसाठी ते सदैव तत्पर असत.

- हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

अजितदादांशिवाय राजकारण बेचव

❝अजितदादांचे विमान अपघाती मृत्यूनंतर महाराष्ट्र शोक सागरात बुडाला आहे. दादांना मुख्यमंत्री व्हायचे होते. ते मुख्यमंत्री झाले असते तर ते राज्याचे उत्तम आणि कार्यक्षम मुख्यमंत्री ठरले असते. आता अजितदादांशिवाय महाराष्ट्रातील राजकारण बेचव आणि आळणी होईल. आजचा दिवस म्हणजे सामाजिक जीवनातील काळा दिवस आहे.

- संजय राऊत, नेते, शिवसेना (ठाकरे)

उद्ध्वस्त !

अजितदादांच्या अपघाती निधनाची बातमी समोर येताच, खासदार आणि अजितदादांच्या भगिनी सुप्रिया सुळे यांनी 'उद्ध्वस्त' असे मोबाईलवर स्टेटस ठेवून भावना व्यक्त केली.

- सुप्रिया सुळे

महाराष्ट्राची अपरिमित हानी

❝ उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मृत्यूच्या बातमीने देशाला धक्का बसला आहे. त्यांच्या निधनाने दिलदार आणि दमदार नेतृत्व; सर्वांचे लाडके दादा; महाराष्ट्राचा लाडका दादा हरपला आहे. अजितदादांच्या निधनाने महाराष्ट्राची अपरिमित आणि कधीही भरून येणार नाही, अशी हानी झाली आहे. तोंडावर सत्य सांगणारा स्पष्टवक्तेपणा त्यांच्याकडे होता. त्यांचा मिश्किल स्वभाव लोकांना आवडणारा होता. ते पहिल्यापासूनच प्रचंड मेहनती, कष्ट करणारे आणि शिस्तीचे नेते होते.

-रामदास आठवले, अध्यक्ष, रिपब्लिकन पक्ष

त्यांचे योगदान महाराष्ट्र सदैव स्मरणात ठेवेल

❝दिलेला वेळ आणि शब्द पाळणारे, अशी ख्याती असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार अचानक वेळेआधी आपल्याला सोडून गेले. वक्तशीरपणा, स्पष्टवक्तेपणा, प्रशासनिक नैपुण्य, संवेदनशील नेतृत्व आणि या सर्वांचा आधार असलेले धडाडीचे विकासोन्मुख राजकारण, असे त्यांच्या विलक्षण कार्यकर्तृत्वाचे योगदान महाराष्ट्र सदैव स्मरणात ठेवेल.

- प्रा. राम शिंदे, अध्यक्ष, विधानसभा

धडक निर्णयक्षमता

❝अजितदादा पवार यांच्या कार्यशैलीचे नेहमीच कौतुक वाटायचे. कामांच्या बाबतीत त्यांची धडक निर्णयक्षमता आणि प्रशासनावरील पकड कित्येक वेळा जवळून पाहण्याचा योग आला. लोककल्याणाच्या कामांत कोणत्याही प्रकारची तडजोड त्यांनी कधी केली नाही. नेहमी भरभरून देणे व घेतलेले निर्णय स्वत: लक्ष घालून तत्काळ अंमलात आणणे, हे त्यांचे वैशिष्ट्य होते.

- संभाजीराजे छत्रपती

आमचा 'दादा' गेला!

❝नामदार अजितदादा पवार हे नावाप्रमाणेच आम्हा सर्वांचे खऱ्या अर्थाने 'दादा' होते. एक मित्र, एक भाऊ, एक नेता अशा विविध रूपांमध्ये आम्ही सर्वांनीच त्यांना अनुभवले आहे. त्यांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र एका चांगल्या प्रशासकाला, जनतेविषयी प्रचंड आस्था आणि तळमळ असलेल्या एका दूरदृष्टी असणाऱ्या प्रगल्भ नेत्याला कायमचा मुकला आहे. आमचा दादा आम्हाला पोरके करून गेला.

- हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी नेते

उत्तम प्रशासक, कणखर नेतृत्व हरपले

 ❝आपल्या दूरदर्शी व कणखर नेतृत्वाने राज्याच्या राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवणारे अजित दादा पवार यांच्या मृत्यूची बातमी अतिशय वेदनादायक आहे. दादांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणातील 'दादा' व्यक्तिमत्त्व हरपले. स्पष्टवक्ते असले तरी कामाच्या दर्जाच्या बाबतीत ते गंभीर असायचे. कामातील हलगर्जीपणा त्यांनी कधीच मान्य केला नाही. प्रशासकीय कामावरील पकड व विकासाची दृष्टी असलेला जनतेचा नेता आज आपल्यातून निघून गेला. त्यांच्या जाण्याने कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे.

- गणेश नाईक, वनमंत्री

कुटुंबप्रमुख, मार्गदर्शक गमावला

❝अजितदादा पवार यांच्या मृत्यूमुळे आम्ही आमचा कुटुंबप्रमुख, मार्गदर्शक गमावला आहोत. शेतकऱ्यांप्रति असलेली त्यांची तळमळ, संवेदनशीलता आणि समर्पण मी जवळून अनुभवली आहे. माझ्या वैयक्तिक तसेच सार्वजनिक जीवनात अजितदादांचे मार्गदर्शन, विश्वास आणि पाठबळ मला सदैव प्राप्त झाले. कठीण निर्णयांच्या प्रसंगी त्यांची स्पष्ट, ठाम भूमिका, प्रशासनाशी असलेली मजबूत पकड आणि कार्यकर्त्यांप्रति असलेली आपुलकी आम्हा सर्वांसाठी नेहमीच प्रेरणादायी राहिली.

- सुनील तटकरे, राष्ट्रवादी नेते

कामाचा प्रचंड आवाका असलेला नेता

❝कामाचा प्रचंड आवाका आणि उरक असणारा हा लोकप्रिय लोकनेता नियतीने आपल्यापासून हिरावला. प्रत्येक ठिकाणी वेळेत जाणारे दादा आज चुकीच्या वेळी गेले. शब्द अपुरे आहेत आणि भावना गोठल्या आहेत. पवार कुटुंबीयांच्या या दु:खद प्रसंगात आम्ही सहभागी आहोत.

- जितेंद्र आव्हाड, आमदार, राष्ट्रवादी

कणखर नेतृत्व हरपले

❝अजित पवार यांच्या मृत्यूने महाराष्ट्राने एक कणखर, शिस्तबद्ध, वक्तशीर आणि कार्यतत्पर नेतृत्व गमावले आहे. ही पोकळी कधीही भरून निघणार नाही. प्रशासनावर जबरदस्त पकड आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास असलेले धडाडीचे नेते अशी त्यांची ओळख होती. महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री पद भूषवण्याचा विक्रम त्यांनी नोंदवला होता.

- रवींद्र चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, भाजप

कुशल प्रशासक

❝अजितदादा हे राजकारणात शब्द पाळणारे कुशल प्रशासक होते. जे होणार नाही ते स्पष्ट सांगणार आणि जे होणार ते काम करणार, असे स्पष्टवक्ता नेता होते मी ज्यावेळी मंत्रिमंडळात पहिल्यांदा आलो तेव्हा मी त्यांचा राज्यमंत्री होतो. त्यांनी मला विभागाचे कामकाज कसे वागायचे याचे धडे त्यांनी मला दिले. त्यांच्याबरोबर कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले. २५ वर्षे त्यांच्याबरोबर काम केले. आज महाराष्ट्राच्या मातीतला मोठा नेता गमावला आहे.

- विजय वडेट्टीवार, काँग्रेस, विधिमंडळ पक्षनेते

राजकारणापलीकडचा मित्र

❝अजितदादा पवार यांच्या मृत्यूची घटना अत्यंत वेदनादायी असून राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार करणारा एक मित्र आपण गमावला आहे. गेली अनेक वर्षे विधिमंडळात आणि राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांच्या समवेत काम करण्याची संधी मिळाली. स्पष्टवक्तेपणा असला तरी मनाने अतिशय प्रेमळ आणि विकासात्मक दृष्टिकोन ठेवून सर्वांना oiOOबरोबर घेऊन जाण्याची हातोटी त्यांची होती.

- राधाकृष्ण विखे-पाटील, मंत्री

लोकनेता हरपला

❝अजितदादा पवार यांच्या बारामती येथील विमान अपघातातील मृत्यूने मी अक्षरशः हादरून गेलो. मन सुन्न झाले आहे. या दुःखद बातमीवर अजूनही विश्वास बसत नाही. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला दिशा आणि गती देणारे लोकनेते म्हणून अजितदादांचे व्यक्तिमत्त्व कायम स्मरणात राहील.

- चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री

जीवाला चटका लावून गेलात

❝दादा अशी एक्झिट घ्यायची नव्हती!! ... तुम्ही जीवाला चटका लावून गेलात... तुम्ही सदैव स्मरणात राहाल.. तुमच्याबरोबर प्रवास केला, चर्चा केल्या, अगदी गप्पाही खूप मारल्या.. तुमचा राजकीय आणि अकॅडमिक सेन्स खूप जबरदस्त होता. आज तुमच्या जाण्याने तुम्ही कार्यकर्त्यांना रडवले..असा अनुभवी नेता होणे नाही.

- पंकजा मुंडे, मंत्री

विकासाचा झंझावात शांत

❝नियतीने आपल्या सर्वांवर हा अत्यंत क्रूर आघात केला आहे. अजितदादांचे जाणे ही केवळ एका पक्षाची किंवा कुटुंबाची हानी नसून संपूर्ण महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाचे मोठे नुकसान आहे. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या विकासाचा झंझावात शांत झाला आहे.

- आकाश फुंडकर, मंत्री

मन हेलावून टाकणारा मृत्यू

❝उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा आकस्मिक मृत्यू दुःखद आणि मन हेलावून टाकणारा आहे. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

- मंगलप्रभात लोढा, मंत्री

मन सुन्न झाले

❝उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू अत्यंत धक्कादायक, वेदनादायी आणि मन सुन्न करणारे आहे. त्यांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्राने एक अत्यंत अभ्यासू, अनुभवी, कर्तबगार, अजातशत्रू आणि लोकाभिमुख नेतृत्व गमावले आहे.

- जयकुमार रावल, मंत्री

मनाला तीव्र वेदना

❝आमचे लाडके, कणखर, प्रेमळ आणि सदैव मार्गदर्शक असलेले अजितदादा आपल्यातून निघून गेले, हे वास्तव स्वीकारणे अशक्य वाटत आहे. कामाप्रति प्रचंड निष्ठा असलेले, कुशल प्रशासक, दिलेला शब्द पाळणारे आणि महाराष्ट्रातील लोकप्रिय नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूची बातमी मनाला तीव्र वेदना देणारी आहे.

- नरहरी झिरवाळ, मंत्री

विकासाची दूरदृष्टी ठेवणारे दादा

❝सदैव वेळ पाळणारे दादा आज वेळेआधीच आपल्यातून निघून गेले, ही घटना मनाला सुन्न करणारी आहे. स्पष्टवक्तेपणा, निर्भीड व्यक्तिमत्त्व, पहाटेपासून जनतेच्या सुखदुःखात स्वतःला वाहून घेणारे, महाराष्ट्राच्या विकासाची दूरदृष्टी ठेवणारे दादा आज आपल्यात नाहीत.

- दादा भुसे, मंत्री

.....................................

कधीही भरून न येणारे नुकसान - राष्ट्रपती मुर्मू

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत शोक व्यक्त केला आहे. राष्ट्रपती यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. महाराष्ट्रातील बारामती येथे झालेल्या विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतरांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दुःख झाले. अजित पवार यांचे अकाली निधन हे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. महाराष्ट्राच्या विकासात, विशेषतः सहकार क्षेत्रात त्यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल ते नेहमीच लक्षात राहतील. मी त्यांचे कुटुंबीय, समर्थक आणि चाहत्यांप्रति माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करते. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सर्वांच्या कुटुंबीयांनाही देव हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, अशा शब्दांत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अत्यंत धक्कादायक - पंतप्रधान नरेंद्र मोदी

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाचे वृत्त समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. अजित पवार हे जनतेशी घट्ट नाते असलेले, तळागाळाशी मजबूत नाळ असलेले लोकनेते होते, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेत सदैव अग्रभागी राहणारे एक मेहनती व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांना व्यापक आदर होता. प्रशासकीय बाबींची त्यांना सखोल जाण होती. गरीब आणि वंचितांच्या सक्षमीकरणासाठीची त्यांची तळमळ विशेष उल्लेखनीय होती, अशा शब्दांत पंतप्रधानांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. बारामती येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातामुळे मी अत्यंत दुःखी आहे. या अपघातात आपल्या प्रियजनांना गमावलेल्या सर्वांच्या दुःखात मी सहभागी आहे. या दुःखाच्या क्षणी शोकाकुल कुटुंबांना शक्ती आणि धैर्य मिळो, ही प्रार्थना करतो, असेही मोदी यांनी म्हटले आहे.

निव्वळ अपघात, यात राजकारण नाही - शरद पवार

अजितदादांच्या निधनामुळे महाराष्ट्राचे नुकसान झाल्याची भावना शरद पवारांनी व्यक्त केली. महाराष्ट्राचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाल्याचे शरद पवार म्हणाले. बारामतीत पोहोचल्यानंतर शरद पवारांनी रुग्णालयात अजित पवारांचे पार्थिव पाहिले. अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवारांचाही कंठ दाटल्याचे दिसून आले. माध्यमांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले, 'हा खूप मोठा धक्का आहे. महाराष्ट्राला जे नुकसान झाले, ते भरून निघणार नाही. यामध्ये कुठलेही राजकारण नाही. हा निव्वळ अपघात आहे. या घटनेचे कोणीही राजकारण करू नये’.

मी महाराष्ट्रातील जनतेच्या सोबत - राहुल गांधी

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी 'एक्स' पोस्टवर अजित पवारांच्या निधनावर तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. राहुल गांधी यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे विमान अपघातात निधन झाल्याचे वृत्त अत्यंत वेदनादायी आहे. या शोकसागरात मी महाराष्ट्रातील जनतेच्या सोबत आहे. संपूर्ण पवार कुटुंब आणि त्यांच्या प्रियजनांप्रति या दु:खाच्या प्रसंगी मी माझ्या संवेदना व्यक्त करतो.

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत चौकशी करा - खर्गे

अजित पवार यांचे विमान अपघातात झालेले निधन ही अत्यंत दु:खद आणि धक्कादायक घटना असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिली आहे. अजित पवार यांचा मृत्यू हा अकाली असून, कार्यक्षम आणि काम करणाऱ्या नेत्याचा अशा प्रकारे अंत होणे हे सर्वांसाठी दु:खदायक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या घटनेमुळे पवार कुटुंबीयांवर मोठे दु:ख कोसळले असून त्यांच्या वेदनेत आपणही सहभागी आहोत, अशी भावना खर्गे यांनी व्यक्त केली. कुटुंबीयांना हे दु:ख सहन करण्याची ताकद मिळो, हीच आम्ही प्रार्थना करू शकतो. या विमान अपघाताची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी, अशी मागणी खर्गे यांनी केली.

ते दीर्घद्वेषी नव्हते - उद्धव ठाकरे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राला धक्का बसला. त्यांच्या अपघाती मृत्यूने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही दुःख अनावर झाले. माझ्या मंत्रिमंडळातील मी उमदा सहकारी गमावला. अजित पवार हे दिलखुलास होते. मनात येईल ते बोलायचे. ते दीर्घद्वेषी नव्हते, अशा भावना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्या. अजित पवार यांच्या निधनानंतर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, एक खंबीर नेता व माझ्या मंत्रिमंडळातील मी उमदा सहकारी गमावला! अत्यंत शिस्तप्रिय, आपल्या खात्यावर वचक व अर्थ विभागाचा अभ्यास असणारे ते नेते होते.

logo
marathi.freepressjournal.in