पहाटेच्या शपथविधीबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अद्याप तरी अर्धेच सांगितले - मुख्यमंत्री शिंदे

‘‘फडणवीस मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी अनेक प्रकल्प सुरू केले. मात्र, नंतरच्या सरकारच्या काळात त्यात अनेक स्पीडब्रेकर आले.
पहाटेच्या शपथविधीबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अद्याप तरी अर्धेच सांगितले - मुख्यमंत्री शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला विधानसभेत उत्तर देताना महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला चढविला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांनी जोरदार टोलेबाजी केली. विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनाही त्यांनी चिमटे काढले. महाविकास आघाडी सरकारला सत्तेतून अचानक पायउतार व्हावे लागल्याने त्यांचा तीळपापड होत आहे. त्यांच्या नेत्यांच्या डोळ्यांसमोर अंधारी आली आहे. आमची चांगली आणि वेगवान कामे बघून पोटदुखी सुरू झाली आहे. त्यांच्यावर आमच्या बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यात जालीम उपाय करावे लागणार आहेत. पहाटेच्या शपथविधीबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अद्याप तरी अर्धेच सांगितले आहे. पूर्ण जेव्हा सांगतील तेव्हा अनेकांना मोठा शॉक बसणार आहे. मला देखील तोंड उघडायला लावू नका, असा इशाराही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला.

राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. राज्यातील विविध विकासकामांची, शेतकऱ्यांना मदत केल्याची माहिती तर त्यांनी दिलीच, पण त्याचसोबत विरोधकांच्या आक्षेपांमधील हवा देखील त्यांनी काढली. अचानक सत्ता गेल्याने आघाडीच्या नेत्यांच्या डोळ्यांसमोर अंधारी आल्याचे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘फडणवीस मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी अनेक प्रकल्प सुरू केले. मात्र, नंतरच्या सरकारच्या काळात त्यात अनेक स्पीडब्रेकर आले. आता आम्ही त्या प्रकल्पांना पुन्हा वेग दिला आहे. यामुळे अनेकांची पोटदुखी झाली आहे. त्यावर आमच्या बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यात जालीम औषध देण्यात येणार आहे.’’

मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘वर्षा बंगल्यावर चहापानावर दोन कोटींचा खर्च झाल्याचे अजितदादा म्हणतात, पण वर्षा बंगला तर सर्वसामान्यांसाठी अडीच वर्षे बंदच होता. आता तो खुला झाला आहे. आधी तर कोविडची टेस्ट केल्याशिवाय कोणाला प्रवेशच नव्हता. कोणीच यायचे नाही, त्या बंगल्यावर. अजितदादा विचारतात, चहात काय सोन्याचे पाणी टाकता काय. दादा माझ्याकडे राज्यातून सोन्यासारखी माणसे येतात. त्यांना चहा देणे, ही आपली संस्कृती आहे. जाहीरातींवर खर्च केल्याचा आरोप करता, पण विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचलीच पाहिजे. आघाडीच्या काळात पण खर्च झालाच ना. कोणीच येत नसतानाही वर्षावर केवळ फेसबुक लाइव्हचा किती खर्च झाला, याची पण माहिती घ्या. तसेच आम्ही जाहिराती सर्व वर्तमानपत्रांना देतो, अगदी सामना सकट. मग घटनाबाह्य सरकारचे पैसे कसे चालतात, असा सवालही मुख्यमंत्री शिंदे यांनी केला. सिंचनावरही ७० हजार कोटी खर्च झाले होते. मात्र, केवळ ०.१ टक्काच जमीन सिंचनाखाली आली होती. आम्ही मात्र ३८ हजार कोटी खर्च करून ५ लाख २१ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आणणार म्हणजे आणणारच,’’ असा निर्धारही मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in