एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे संग्रहित छायाचित्र

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अखेर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणात वर्णी

राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नियम २०१९ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पुन्हा वर्णी लावण्यात आली आहे.
Published on

मुंबई : राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नियम २०१९ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पुन्हा वर्णी लावण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातून डावलले, अशी बातमी दैनिक ‘नवशक्ति'च्या अंकात ९ फेब्रुवारीला प्रसिद्ध झाली होती. या बातमीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी ‘प्राधिकरण नियम २०१९’मध्ये सुधारणा करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्राधिकरणात समावेश केला आहे.

‘महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन नियम, २०१९’च्या नियम ३ मध्ये राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची रचना निश्चित करण्यात आली आहे. ही रचना सुधारित करण्यास मान्यता देण्यात आली. या रचनेनुसार राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणात अध्यक्ष आणि नऊ सदस्य असणार आहेत. प्राधिकरणात मुख्यमंत्री हे पदसिद्ध अध्यक्ष, उपमुख्यमंत्री पदसिद्ध सदस्य असणार आहेत. तर अन्य पदसिद्ध सदस्यपदासाठी मुख्यमंत्री प्राधिकरणाचे अध्यक्ष या नात्याने इतर मंत्र्यांना नामनिर्देशित करतील. तसेच अध्यक्ष आपत्ती जोखीम कमी करण्याचे ज्ञान आणि अनुभव असलेल्या व्यक्तिंना अशासकीय सदस्य म्हणून नामनिर्देशित करतील. तसेच राज्य कार्यकारी समितीचे अध्यक्ष, पदसिद्ध सदस्य तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा या समितीत समावेश असणार आहे.

धनंजय मुंडे मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे हे मंत्रिमंडळ बैठकीला मंगळवारी गैरहजर राहिले. डोळ्यावर शस्त्रक्रिया झाल्याने ते उपस्थित राहू शकले नाहीत, असे सांगण्यात आले. मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अटक झाली आहे. तसेच मुंडे यांच्यावर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराचे आरोप समाजसेविका अंजली दमानिया यांनी केले असून, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे वाद टाळण्यासाठी मुंडे हे मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर राहिल्याची चर्चा आहे.

logo
marathi.freepressjournal.in