

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज (दि.२८) सकाळी ८.४५ च्या सुमारास बारामती विमानतळाजवळ विमान अपघातात दुर्देवी मृत्यू झाला. खासगी चार्टर्ड विमान धावपट्टीवर उतरताना दुर्घटनाग्रस्त झाले. यात अजित पवार यांच्यासह विमानातील सर्व ५ जण ठार झाले. अजित पवारांच्या अचानक मृत्यूमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात शोककळा पसरली असून सर्वच क्षेत्रांतून तीव्र दुःख व्यक्त केले जात आहे. दादांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांची बहीण आणि खासदार सुप्रिया सुळे यांनाही मोठा धक्का बसलाय.
अजित पवार यांच्या मृत्यूनंतर सुप्रिया सुळे यांनी स्वतःच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर "DEVASTATED" अर्थात उद्ध्वस्त असे लिहून एकाच शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तर, अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनाही या दुर्घटनेची माहिती मिळताच रडू कोसळले.
रोहित पवारही भावूक, अश्रू आवरणे कठीण
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार दादांच्या मृत्यूचे वृत्त समजताच बारामती येथील अहिल्यादेवी होळकर सरकारी रुग्णालयात पोहोचले. रुग्णालयाबाहेरील गर्दीतून वाट काढत भावनांना आवर घालत रोहित पवार प्रचंड भावूक झालेले यावेळी पाहायला मिळाले. त्यांना पाहताच रुग्णालयाबाहेर उपस्थित कार्यकर्त्यांनी मोठा आक्रोश केला.
दरम्यान, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आला असून, DGCA आणि संबंधित यंत्रणा सविस्तर चौकशी करणार आहेत. सुप्रिया सुळे, शरद पवार यांच्यासह अन्य कुटुंबीय आणि निकटवर्तीय बारामतीकडे रवाना झाले आहेत. माहितीनुसार, जिल्हापरिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी बारामतीमध्ये अजित पवार यांच्या चार सभा होणार होत्या. त्यासाठी ते सकाळी एका खासगी चार्टर्ड विमानाने मुंबईहून बारामती विमानतळावर पोहोचले होते.