कारसेवेला गेल्याचा पुरावा देत फडणवीसांचे  विरोधकांना चोख प्रत्युत्तर; नागपूर रेल्वे स्थानकावरील फोटो केला शेअर

कारसेवेला गेल्याचा पुरावा देत फडणवीसांचे विरोधकांना चोख प्रत्युत्तर; नागपूर रेल्वे स्थानकावरील फोटो केला शेअर

या छायाचित्राच्या माध्यमातून जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाल्याचे फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. यावेळी त्यांनी नवभारत परिवाराचे आभारही मानले आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना आपण कारसेवक होतो आणि अयोध्येला गेलो होतो असे सांगितले होते. यावरुन विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली होती. तसेच, याचा पुरावादेखील मागितला होता. यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी पुरावा दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी वृत्तपत्रात प्रकाशित झालेले एक छायाचित्र ट्विटवर शेअर केले आहे.

फडणवीस यांनी नागपुरातून अयोध्या येथे कारसेवेला जात असतानाचे नागपूर रेल्वे स्थानकावरचे एक छायाचित्र ट्विट केले आहे. त्यावेळी नागपूर रेल्वे स्थानकावर अयोध्येला जाणाऱ्या कारसेवकांची गर्दी उसळली होती. या गर्दीचे छायाचित्र 'नवभारत' या वृत्तपत्रात प्रकाशित झाले होते. या छायाचित्रात देवेंद्र फडणवीस हे देखील दिसत आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी "जुनी आठवण", असे म्हणत हे छायाचित्र शेअर केले आहे. छायाचित्रकार शंकर महाकाळकर यांनी हे छायाचित्र टिपले आहे. 22 जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असताना या छायाचित्राच्या माध्यमातून जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाल्याचे फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. यावेळी त्यांनी नवभारत परिवाराचे आभारही मानले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला होता अनुभव-

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत आपण 1990 साली पहिल्या कारसेवेत सहभागी असल्याचे सांगितले होते. यावेळी आपण नागपूरहून रेल्वेने विनातिकीट गेलो होतो. त्यावेळी देवराह बाबांच्या आश्रमात राहिलो. थंडी होती पण आम्ही ठाम होतो. एके दिवशी अयोध्येच्या दिशेने जात असताना पोलिसांनी अडवले. दोन्ही बाजूंनी गोळ्या चालवल्या जात होत्या. काही कारसेवकांनी नदीत उड्या मारल्या. त्यात काहींचा मृत्यू झाला. आम्हाला अटक करून बदायूँच्या तुरुंगात पाठवले गेले. अनेक दिवस कैदेत होतो, असेही फडणवीस यांनी सांगितले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in