मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटानं सावध पवित्रा घेत सर्व आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भाजपनं विधान परिषदेच्या निवडणुकीत दगाफटका टाळण्यासाठी आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना ठाकरे गटाप्रमाणेच भाजपचेही सर्व आमदार १० ते १२ जुलै दरम्यान हॉटेलमध्ये मुक्कामी असतील. यादरम्यान आमदारांना निवडणुकीसंदर्भात महत्त्वाच्या सूचनाही देण्यात येणार आहेत.
भाजपचे ५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात-
येत्या १२ जुलै रोजी विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक होत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून एकूण ११ जागांसाठी १२ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. यामुळं एका उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागणार हे निश्चित आहे. त्यामुळं सर्व राजकिय पक्षांकडून सावधगिरी बाळगली जात आहेत. या निवडणूकीमध्ये भाजपकडून एकूण पाच उमेदवार निवडणुकीला सामारे जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपकडून विशेष काळजी घेण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपनं खबरदारी घेत पक्षाच्या सर्व आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १० ते १२ जुलैदरम्यान ठाकरे गटाच्या आमदारांप्रमाणेच भाजपच्या आमदारांचाही हॉटेलमध्ये मुक्काम असणार आहे.
११ जागा १२ उमेदवार...
येत्या १२ जुलै रोजी विधान परिषदेच्या ११ रिक्त जागांसाठी निवडणूक होत आहे. यामध्ये भाजपचे ५, शिवसेना शिंदे गटाचे २, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे २, काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना ठाकरे गटाचा प्रत्येकी १ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहे.
भाजपचे उमेदवार-
पंकजा मुंडे
परिणय फुके
अमित बोरखे
योगेश टिळेकर
सदाभाऊ खोत
शिवसेना (शिंदे गट)-
भावना गवळी
कृपाल तुमणे
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)-
राजेश विटेकर
शिवाजीराव गर्जे
काँग्रेस-
डॉ. प्रज्ञा राजीव सातव
शेतकरी कामगार पक्ष-
जयंत पाटील
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)-
मिलिंद नार्वेकर
कशी होणार निवड:
विधानसभेतील आमदारांमधून विधानपरिषदेच्या सदस्यांची निवड होणार आहे. विधानसभेतील एकूण आमदारांची संख्या भागिले विधानपरिषदेतील रिक्त जागांची संख्या अधिक १ या पद्धतीनं कोटा ठरतो. राज्यात विधानसभेच्या एकूण जागा २८८ आहेत. पण, परंतु काही आमदारांनी विविध कारणांमुळं राजीनामे दिल्यामुळं हे संख्याबळ २७४ वर आलं आहे. त्यामुळं विधानपरिषदेवर निवडून येण्यासाठी उमेदवाराला २३ (२४४ भागिले ११ अधिक १=२२.८३) मतं आवश्यक आहेत. मतमोजणीत २३ मतांचा कोटा पूर्ण केलेले उमेदवार पहिल्याच फेरीत विजयी होतील. तसं न झाल्यास दुसऱ्या पसंतीची आणि आवश्यकता भासल्यास तिसऱ्या पसंतीची मतं मोजली जातील आणि त्यातून निकाल ठरणार आहे.