

मुंबई : मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या निम्म्यावर आणण्याचा तसेच मंत्री, अधिकाऱ्यांचे परदेश दौरा रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी घेतला. तसेच मंत्री-अधिकारी यांना आवर्जून मेट्रोसारख्या सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवण्याचा तसेच पहिल्या टप्प्यात किमान एक दिवस असा प्रयोग करण्याच्या सूचना फडणवीस यांनी केल्या आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी दोन उच्चस्तरीय बैठकीत विविध उपाययोजनांचा आढावा घेऊन काही निर्णय जाहीर केले.
या निर्णयानुसार मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या घटवून ती लगेच अर्ध्यावर आणण्यात यावी, बाहेरच्या प्रवासात असताना ताफ्यातील वाहनांची संख्या निर्धारित संख्येपेक्षा अधिक नसेल याची जबाबदारी संबंधित पोलिस आयुक्त किंवा पोलिस अधीक्षक यांची असेल, अशा सूचना फडणवीस यांनी दिल्या आहेत.
मंत्री-अधिकार्यांनी कोणतेही विदेश दौरे करु नयेत. मंत्र्यांनी अत्यावश्यक नसेल तेव्हा शासकीय विमान, हेलिकॉप्टर यांचा वापर करु नये, त्याऐवजी नियमित विमानसेवेचा वापर करावा. अधिकार्यांना बैठकांना बोलावण्याऐवजी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठका घ्याव्यात. शासनात वितरित करण्यात आलेल्या वाहनांचा कोटेकोरपणे आढावा घेण्यात यावा. ऊर्जा बचतीसाठी अनावश्यक होर्डिंग्ज/फ्लेक्सवरील कारवाई वाढवण्यात याव्यात आणि तेथे डेकोरेटिव्ह लायटिंगचा वापर होणार नाही, याची काळजी घेण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या बैठकांना मुख्य सचिव, पोलिस महासंचालक आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पंतप्रधानांच्या उपायांकडे सकारात्मकतेने पाहावे...
पंतप्रधान मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनावरून विरोधकांकडून सातत्याने टीका केली जात आहे. यावर बोलताना फडणवीस म्हणाले, जागतिक संकटाच्या वेळी देशाचे पंतप्रधान काही उपाय सांगत असतील, तर त्याकडे सकारात्मकपणे पाहिले पाहिजे. जगभरातील अनेक देशांची स्थिती बिकट आहे. अनेक देशांमध्ये लॉकडाउन लागलेला आहे. पेट्रोलचे दर ४५० ते ५०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. तीन-तीन दिवस पेट्रोल मिळत नसल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आवाहनाची थट्टा-मस्करी न करण्याचा सल्ला
जागतिक संकटात देशाची अर्थव्यवस्था सुरळीत राहावी, देशासमोर संकट निर्माण होऊ नये, या दृष्टीने पंतप्रधान काही उपाय सांगत असतील आणि विरोधकांना त्या अंमलात आणयच्या नसतील, तर किमान त्याची थट्टा-मस्करी तरी करू नका, असा सल्ला फडणवीस यांनी विरोधकांना दिला.
एकनाथ शिंदे यांच्याकडून ईव्ही गाडीचा वापर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला तत्काळ प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ईव्ही गाडी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी आपल्या निवासस्थानाहून सह्याद्री अतिथीगृहात जाण्यासाठी त्यांनी ईव्ही गाडीचा वापर केला. त्यासोबतच आपल्या ताफ्यातील वाहने देखील कमी केली असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्याला सुरक्षा रक्षकांची वाहने सोडल्यास अन्य वाहने सोबत ठेवणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले. याशिवाय नगरविकास विभागाच्या वतीने डेन्मार्क येथे आयोजित केलेला परदेश दौराही रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती शिंदे यांनी दिली.