"उद्धव ठाकरेंमुळे मराठा आरक्षण रद्द झालं..." देवेंद्र फडणवीस यांची टीका

उद्धव ठाकरेंमुळे मराठा आरक्षण रद्द झालं, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
"उद्धव ठाकरेंमुळे मराठा आरक्षण रद्द झालं..." देवेंद्र फडणवीस यांची टीका
Published on

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले आहे. मराठा आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी त्यांनी सरकारला 13 जुलैपर्यंतची वेळ दिली होती. परंतु सरकारने कोणताही निर्णय न घेतल्यामुळे त्यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंवर टीकास्र सोडलं आहे. उद्धव ठाकरेंमुळे मराठा आरक्षण रद्द झालं, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. पुण्यात भाजपाच्या मेळाव्यात ते बोलत होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “भारतीय जनता पक्षाने मराठा आरक्षणाबाबत नेहमीच भूमिका स्पष्ट केली आहे. मराठा समाजातील गरीबांना आरक्षण मिळालं पाहिजे, असं आमचं दिवसापासूनचं मत आहे. खरं तर आरक्षणाची लढाई १९८२ साली सुरू झाली होती. त्यावेळी अण्णासाहेब पाटील यांनी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना आरक्षण मागितलं होतं. मात्र, त्यांनी आरक्षण दिलं नाही. तेव्हापासून आजपर्यंत राज्यात अनेक सरकारे आलीत. शरद पवार हे स्वत: चार वेळा मुख्यमंत्री होते. मात्र, त्यांनी आरक्षण दिलं नाही.”

ते पुढं म्हणाले की, “आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. केवळ आरक्षण दिलं नाही, तर ते आरक्षण उच्च न्यायालयात टीकवलं. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातदेखील दाखल करण्यात आलं होतं. मात्र, जोपर्यंत आम्ही सत्तेत होतो, तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने तीनवेळा मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास नकार दिला होता. पण दुर्देवाने उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचं सरकार राज्यात आलं आणि मराठा आरक्षण रद्द झाले."

logo
marathi.freepressjournal.in