"फोटोग्राफीची आवड असणारा व्यक्ती मुख्यमंत्री झाला तर..." फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

व्यक्तीला ज्या गोष्टीची आवड आहे, ती गोष्ट करायला हवी. तरच त्याचा फायदा होतो, असा मिश्कील टोला देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
"फोटोग्राफीची आवड असणारा व्यक्ती मुख्यमंत्री झाला तर..." फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

मुंबई: व्यक्तीला ज्या गोष्टीची आवड आहे, ती गोष्ट करायला हवी. तरच त्याचा फायदा होतो, असा मिश्कील टोला देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना लगावला. फोटोग्राफीचं पॅशन असलेला व्यक्ती जर मुख्यमंत्री झाला तर अडचण होते, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. भाजप आमदार अमित साटम यांनी लिहिलेल्या 'उडान' या पुस्तकाचं प्रकाशन सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते पाडलं. या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी हे विधान केलं. देवेंद्र फडणवीस यांच्या या विधानानं उपस्थितांमध्ये हशा पिकला.

फोटोग्राफीचं पॅशन असणारा व्यक्ती मुख्यमंत्री झाला तर...

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस म्हणाले की, "मला विश्वास आहे, मी तुम्हाला ( आमदार अमित साटम) पाहिलंय. हे तुमचं पॅशन आहे. मी तेव्हाही तुम्हाला पाहिलंय, जेव्हा तुम्ही नगरसेवकही नव्हता. मी तुम्हाला तेव्हाही पाहिलंय, जेव्हा तुम्ही एक निवडणूक हरला होता आणि दुसऱ्या निवडणूकीची तयारी करत होता. त्यानंतर तुम्ही निवडूनही आला. खरंच, तुम्ही तुमच्या पॅशनला तुमचं करीयर बनवलं. हे गरजेचं आहे. कारण बऱ्याचदा काय होतं, एखादा व्यक्तीचं पॅशन फोटोग्राफी असतं आणि तो मुख्यमंत्री बनतो, तेव्हा अडचण होते. ज्या गोष्टीचं तुम्हाला पॅशन आहे, ती गोष्ट केली, तर निश्चितपणे त्याचा फायदा होतो."

अनेक आमदार फक्त व्हिडिओ बनवण्यासाठी बोलतात...

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, "अतिशय व्यस्त अशा राजकारणातून वेळ काढून अमित साटम यांनी पुस्तक लिहिले. मी थोडं वाचले आहे. नव्या पिढीला दिशा देण्याचे काम या पुस्तकातून केले आहे. अमित साटम हे आक्रमक राजकारणी आहेत. राजकारण सोडून शांत आणि संयमी व्यक्ती म्हणून अमित साटम प्रसिद्ध आहेत. के श्रीकांत हे ज्याचे आवडते फलंदाज असतील तर ती व्यक्ती आक्रमक असणारच. ज्यांना विषयाची पूर्ण माहिती असते, त्या आमदारांमध्ये अमित साटम यांचे नाव येते. अनेक आमदार फक्त व्हिडिओ बनवण्यासाठी बोलतात. फक्त तीन ते चार आमदार असे आहेत ज्यांना विषयाची पूर्ण माहिती असते, त्यातले अमित साटम आहेत."

logo
marathi.freepressjournal.in