

मुंबई : अत्यल्प पाऊसमानामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देऊन दिलासा दिला जाईल. संकटाच्या काळात सरकार शेतकऱ्यांसोबत असून त्यांनी कोणतीही चिंता करू नये, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दुष्काळग्रस्तांना आश्वस्त केले. दुष्काळाच्या संहितेच्या ट्रिगर-१ नुसार देण्यात येणाऱ्या मदतीचा आदेश उद्याच काढण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी गुरुवारी वाशिम जिल्ह्यातील कारंजा, मंगरुळपीर आणि मालेगाव तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांचा दौरा केला. त्यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना फडणवीस यांनी, शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारकडून तातडीने मदत देण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच केंद्राच्या मदतीसाठी आवश्यक असणारे पंचनामे आदी प्रक्रिया करून मदतीसाठी प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
रब्बी पिकांसाठी राज्य सरकारचा पुढाकार
येत्या काळात चारा आणि पाणीटंचाईबाबत उपाययोजना करून अन्नधान्याचीही मदत करावी लागणार आहे. शेतकऱ्यांच्या पाल्यांच्या शिक्षणामध्ये खंड पडू नये यासाठी थेट मदत करण्यात येईल. रब्बीमध्ये काही ठिकाणी उपलब्ध असलेल्या पाण्यावर पिके घेण्याबाबत तपासणी करण्यात येईल. तसेच रब्बी पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल. याशिवाय रोजगार उपलब्ध होण्यासाठी जलसंधारणाच्या कामांवर भर देण्यात येईल. जलसाठे आटलेले असल्यामुळे यातील गाळ काढणे, जलतारा स्ट्रक्चर निर्माण करणे आणि दुरुस्ती आवश्यक असलेले तलाव शोधून त्यांची दुरुस्ती करण्यात येईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.
कर्जाची रक्कम थेट खात्यात
सर्वदूर पिकांची परिस्थिती सारखीच असल्यामुळे राज्य सरकारने मदतीचे धोरण आखले आहे. सरकारने कृषी कर्जमाफी केली असून कर्जाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत जमा होत आहे. कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे बँकांनी कर्ज दिलेच पाहिजे. त्यासोबतच शेतमालाची शासकीय दराने खरेदी केली जाईल, यासाठी लवकरच नोंदणी सुरू करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.