

मुंबई / नागपूर : माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा डाव असल्याच्या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात येईल, अशी माहिती कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत दिली.
विधान परिषदेतील भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करत चौकशीची मागणी केली होती.
महाविकास आघाडीच्या कार्यकाळात तत्कालिन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी दबावतंत्राचा वापर केला होता.
तत्कालीन पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्यावर ही जबाबदारी होती, असा जबाब संजय पूनामिया यांनी दिला आहे.
हे प्रकरण गंभीर असून या घटनेची एसआयटीमार्फत चौकशी व्हावी, पोलीस उपायुक्त पाटील यांना तातडीने निलंबित करावे, सरकारी वकील शेखर जगताप यांना पॅनलवरून काढावे, संजय पांडे यांना यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी दरेकर यांनी केली. नीलम गोऱ्हे यांनी दरेकर यांच्या मागणीची दखल घेत कारवाई करण्याची सूचना सरकारला केली.
संभाषणाची क्लिप भाजप आमदार प्रवीण दरेकरांकडून सभागृहात सादर
पोलीस अधिकाऱ्यांच्या चर्चेची ऑडिओ क्लिप भाजप गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी विधानपरिषदेच्या सभागृहात मंगळवारी सादर केली. विधान परिषदेत याचे पडसाद उमटले. दरेकर यांनी विधिमंडळ सभागृहात पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन दरम्यान ही क्लीप परिषदेच्या उपाध्यक्षा नीलम गोऱ्हे यांना पेनड्राइव्हमधून सादर केली. या प्रकरणाची एसआयटीमार्फत तात्काळ चौकशी करण्याची मागणीही भाजपच्या आमदाराने केली होती.