"म्हणून राष्ट्रवादीला मंत्रिपद नाही..." देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं कारण

"आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसला मंत्रिमंडळात एक जागा दिली होती, परंतु..." अजितदादांना एकही मंत्रिपद न देण्यावर नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
"म्हणून राष्ट्रवादीला मंत्रिपद नाही..." देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं कारण
Published on

मुंबई: नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. आज सायंकाळी ७ वाजता हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्यात महाराष्ट्रातील सहा खासदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यामध्ये भाजपच्या चार तर शिवसेना शिंदे गट आणि आरपीआय आठवले गट यांच्या प्रत्येकी एका मंत्र्याचा समावेश आहे. दरम्यान या मंत्रिमंडळात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही मंत्री शपथ घेणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यामागचं कारण सांगितलं. राष्ट्रवादीला राज्यमंत्री स्वतंत्र कार्यभार ऑफर करण्यात आलं होतं. मात्र कॅबिनेट मंत्रिपद हवं असल्यामुळं राष्ट्रवादीनं हे मंत्रिपद नाकारलं, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

देवेंद फडणवीस म्हणाले की, "राष्ट्रवादी काँग्रेसला मंत्रिमंडळात एक जागा देण्यात आली होती. राज्यमत्री स्वतंत्र प्रभार ही जागा त्यांना देण्यात आली होती. मात्र त्यांचा कॅबिनेट मंत्रीपदासाठी आग्रह होता. आमच्याकडून प्रफुल पटेल यांचं नाव निश्चित आहे. ते आधी कॅबिनेट मंत्री राहिले आहेत, त्यामुळं आम्हाला राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार मंत्री नको, असं ते म्हणाले. जेव्हा आघाडीचं सरकार असतं, तेव्हा अनेक निकष असतात. कारण अनेक पक्ष सोबत असतात, त्यामुळं एका पक्षासाठी ते मोडता येत नाहीत. जेव्हा भविष्यात मंत्रिमंडळ विस्तार होईल, तेव्हा निश्चितपणे त्यांचा विचार होईल. पुढच्यावेळी मंत्रीपद दिलं तरी चालेल, पण आम्हाला कॅबिनेट मंत्रिपद द्या. आम्ही थांबायला तयार आहोत, अशी त्यांची (राष्ट्रवादी काँग्रेस) भूमिका आहे."

रोहित पवारांची अजित पवारांवर टीका:

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सध्यातरी एकही मंत्रिपद मिळणार नसल्याचं समोर आलं आहे. यावरूनच रोहित पवार यांनी अजित पवार यांना डिवचलं आहे. भाजपनं लोकसभेपुरता अजितदादांचा वापर करून घेतला, असं रोहित पवार म्हणाले. येत्या काळात राष्ट्रवादी पक्ष अजितदादांकडे राहणार नाही, भाजपच्या चिन्हावर लढायचं हा एकच पर्याय त्यांच्याकडे असेल, असा टोला रोहित पवारांनी अजितदादांना लगावला.

रोहित पवार म्हणाले की, "व्यक्तिगत गिफ्ट अजितदादांना दिलंच आहे, परंतु मंत्रिपद दिलं नाही. आम्ही म्हणत होतो की, लोकसभेपुरताच भाजप अजितदादांचा फायदा करून घेणार...पण फायदा तर काही झालाच नाही. लोकसभेनंतर आता विधानसभा अजितदादा आणि त्यांच्या नेत्यांना जर लढायची असेल, तर त्यांना एकच पर्याय राहणार आहे, तो म्हणजे भाजपचं चिन्ह... तसा संदेशच भाजपच्या केंद्रातल्या मोठ्या नेत्यांनी दिलेला दिसतोय."

logo
marathi.freepressjournal.in