चौदाही जागा महायुती जिंकणार - फडणवीस; गडचिरोलीत माओवादी सक्रिय, विदर्भातील प्रचार अंतिम टप्प्यात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रपुरात प्रचंड मोठी सभा घेतली. नागपूरमध्ये भाजपतर्फे नितीन गडकरी हे उमेदवार असून तेथे मात्र मोदींनी सभा घेतली नाही. परंतु रामटेकचा बराच भाग नागपूरला जोडणारा असल्याने मोदींच्या सभेचा फायदा नागपूरला झाला आहे.
चौदाही जागा महायुती जिंकणार - फडणवीस;
गडचिरोलीत माओवादी सक्रिय, विदर्भातील प्रचार अंतिम टप्प्यात

मुंबई : विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, रामटेक, नागपूर, चिमूर या पाच लोकसभा मतदारसंघांत १९ एप्रिलला तर बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिमच्या ६ मतदारसंघांत अशा एकूण ११ लोकसभा मतदारसंघांतील चित्र स्पष्ट झाले असून २६ एप्रिलला होणाऱ्या विदर्भातील या जागांबरोबर मराठवाड्यातील नांदेड, परभणी व हिंगोली या तीन मतदारसंघांत दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. या १४ लोकसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट झाले असून प्रचारही अंतिम टप्प्यात आला आहे. या १४ ही जागा भाजपची युती जिंकेल, असा दृढ विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रपुरात प्रचंड मोठी सभा घेतली. नागपूरमध्ये भाजपतर्फे नितीन गडकरी हे उमेदवार असून तेथे मात्र मोदींनी सभा घेतली नाही. परंतु रामटेकचा बराच भाग नागपूरला जोडणारा असल्याने मोदींच्या सभेचा फायदा नागपूरला झाला आहे. भंडारा-गोंदिया विद्यमान खासदार भाजपचे असून यापूर्वी या मतदारसंघातून राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल हे निवडून गेले होते. आता ते महायुतीत असल्याने मेंढे यांचे पारडे अधिक जड झाले आहे.

अमरावतीत फारच गुंतागुंत आहे. नवनीत राणा या भाजप उमेदवार आहेत तर त्यांचे पती रवी राणा यांचा स्वतंत्र पक्ष आहे, तर महायुतीचे समर्थक बच्चू कडू यांनी शिवसेनेचे आनंदराव अडसूळविरोधी भूमिका घेतली आहे. मात्र नवनीत राणा यांचे या मतदारसंघात अधिक काम असल्याने संघर्ष हा होणारच. चंद्रपूर हा भाजपचा मतदार संघ परंतु २०१९ मध्ये केंद्रीय मंत्री हंसराज आहिर यांचा प्रभाव करून काँग्रेसचे उमेदवार निवडून आले होते. त्यामुळे ही जागा बिन भरवशाची म्हणून राज्य मंत्री मंडळातील व भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना इरेला टाकले आहे. त्यासाठी पंतप्रधानांची सभा चंद्रपूरला घ्यावी लागली. हे विशेष होय. अकोल्यात वंचित नेते प्रकाश आंबेडकर हे उभे असून भाजपतर्फे पाचवेळा खासदार राहिलेले संजय धोत्रे हे आजारी असल्याने त्यांच्या चिरंजीवास उमेदवारी दिली आहे तेथे चुरस आंबेडकर विरुद्ध धोत्रे अशीच आहे.

तिघा नक्षलींना अटक

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघावर नक्षली छाया पसरली असून मागच्या आठवड्यात तीन माओवाद्यांना कंठस्नान घातले आहे, तर तीन जणांच्या मुसक्या आवळण्यात यश आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in