फडणवीस यांच्या विरोधात काँग्रेसची आचारसंहिता भंगाची तक्रार

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आयोजित एका बैठकीत सोलापूरचे भाजप उमेदवार राम सातपुते यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून एका समाजाच्या काही व्यक्तींवर कोविड काळात दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी केली व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ते गुन्हे मागे घेऊ, चिंता करण्याचे काही कारण नाही, असे आश्वासन त्या बैठकीत उपस्थितांना दिले.
फडणवीस यांच्या विरोधात काँग्रेसची आचारसंहिता भंगाची तक्रार
Published on

प्रतिनिधी/मुंबई

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना  उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा गैरवापर करून आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंद करून त्यांची गृहमंत्री पदावरून तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र लिहून केली आहे. तसेच सोलापूरचे भाजप उमेदवार राम सातपुते यांची उमेदवारी रद्द करा, अशी तक्रारही काँग्रेस पक्षाकडून निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आयोजित एका बैठकीत सोलापूरचे भाजप उमेदवार राम सातपुते यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून एका समाजाच्या काही व्यक्तींवर कोविड काळात दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी केली व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ते गुन्हे मागे घेऊ, चिंता करण्याचे काही कारण नाही, असे आश्वासन त्या बैठकीत उपस्थितांना दिले. निवडणुकीच्या काळात अशा पद्धतीने प्रलोभन देणे, आश्वासन देणे हा आचारसंहितेचा भंग आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्य सरकारच्या समितीने शिफारस केल्याशिवाय हे गुन्हे मागणे घेता येत नाहीत. तरीही मतदारांना प्रलोभन देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी आश्वासन देऊन मतदारांची दिशाभूल केलेली आहे, अशी तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. BJP

आतापर्यंत या समाजातील व्यक्तींवरील गुन्हे का मागे घेतले नाहीत? आता निवडणुकीच्या दरम्यानच या गुन्ह्यांची आठवण कशी झाली? फडणवीस गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन देण्यासाठी निवडणुकीची वाट पहात होते का? असे प्रश्न उपस्थित करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा गैरवापर केल्याचे स्पष्ट दिसत आहे, फडणवीस यांना गृहमंत्रीपदावरून तात्काळ दूर करावे तसेच सोलापूरचे भाजप उमेदवार राम सातपुते यांची उमेदवारी रद्द करा, अशी तक्रार काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली असल्याचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in