

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केलेल्या काटकसरीच्या आवाहनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी समर्थन केले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या आवाहनावर केलेल्या टीकेचा समाचार घेताना, राहुल गांधींचे आकलन मर्यादित असल्याचा टोला फडणवीसांनी लगावला. तसेच . "राहुल गांधी हे राजकारणातील 'रिजेक्टेड माल' आहेत," अशी बोचरी टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे. पंतप्रधानांचा संदेश जनतेला समजला असून, नागरिक त्याला सकारात्मक प्रतिसाद देतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. तसेच अनेक भाजप नेत्यांनी ही टीका फेटाळून लावत पंतप्रधानांचे पाऊल राष्ट्रहिताचे असल्याचे म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी रविवारी पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इंधनाचा जपून वापर करणे, सोने खरेदी आणि परदेश दौरे पुढे ढकलण्याचे आवाहन केले होते. राहुल गांधी यांनी या आवाहनाला 'अपयशाचा पुरावा' असे संबोधले होते. या टीकेला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, मोदींनी काय सांगितले हे राहुल गांधींना समजू शकले नसेल, तर त्यात त्यांचा दोष नाही; कारण त्यांचे आकलनच मर्यादित आहे. राहुल गांधी हे देशातील ‘सर्वात नाकारलेले नेते’ असल्याची टीकाही फडणवीसांनी यावेळी केली.
विरोधकांकडून जनतेची केवळ दिशाभूल
एका जाहीर सभेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी काँग्रेसच्या ध्येयधोरणांचा आणि राहुल गांधींच्या नेतृत्वाचा समाचार घेतला. गेल्या काही निवडणुकांमध्ये काँग्रेसला मिळालेल्या अपयशाचा दाखला देत त्यांनी राहुल गांधींच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "ज्या नेत्याला जनतेने वारंवार नाकारले आहे, त्यांना पुन्हा पुन्हा समोर आणून काँग्रेस काय साध्य करू पाहत आहे? देशातील जनतेने त्यांना पूर्णपणे नाकारले असून ते आता 'कालबाह्य' झाले आहेत. विरोधक केवळ जनतेची दिशाभूल करण्याचे काम करत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.
जागतिक संघर्षामुळे पुरवठा साखळी विस्कळीत
प्रदेश भाजप अध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, जागतिक संघर्षामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून महागाईचा दबाव वाढला आहे. अशा वेळी आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधानांनी हे आवाहन केले आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस आणि सोने यांसारख्या गोष्टींची आयात करावी लागते. भारताचा पैसा देशाबाहेर जाऊ नये आणि जागतिक युद्धासारख्या परिस्थितीचा फटका भारताला बसू नये, हाच पंतप्रधानांच्या आवाहनाचा मुख्य उद्देश असल्याचे बावनकुळे यांनी नमूद केले.