मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचे आहे, मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आरक्षणाविरोधात असून तेच आरक्षणात अडथळा आणत आहेत, असा गंभीर आरोप मनोज जरांगे-पाटील यांनी सोमवारी केला. त्यावर फडणवीस यांनी जरांगे-पाटील यांच्या आरोपांचे खंडन करताना सांगितले की, ‘मराठा आरक्षणात मी बाधा आणली असेल असे जर मुख्यमंत्र्यांनी सांगितले, तर त्याचवेळी मी पदाचा राजीनामा देऊन राजकीय संन्यास घेईन’. फडणवीसांच्या या पलटवारानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा आता मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात ढकलला गेला आहे.
‘मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांचे माझ्यावर विशेष प्रेम आहे, हे मला माहिती आहे. मात्र, राज्याचे सर्व अधिकार हे मुख्यमंत्र्यांकडे असतात. सध्या राज्याचे मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे आहेत. आम्ही त्यांच्यासोबत काम करत आहोत. मराठा समाजासाठी एखादा निर्णय जर मुख्यमंत्री शिंदे घेत असतील आणि मी त्याला विरोध केला असेल, असे त्यांनी सांगितले तर त्याच वेळी मी पदाचा राजीनामा देईन’, असे फडणवीस यांनी जरांगे-पाटील यांच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना सांगितले.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील राजकारण ढवळून निघत आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलेच तापले होते. त्याचा फटका महायुतीला बसला होता. आता विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापू लागला आहे.
जरांगेंच्या विधानात तथ्य - नाना पटोले
मराठा आरक्षणात देवेंद्र फडणवीस यांचा अडथळा आहे, या मनोज जरांगे-पाटील यांच्या विधानात तथ्य आहे. काँग्रेस आघाडीचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राणे आयोग नियुक्त करून मराठा समाजाला आरक्षण दिले होते. पण त्या आरक्षणाविरोधात फडणवीसांच्या जवळचे लोकच कोर्टात गेले होते. मराठा आरक्षणप्रश्नी कोर्टात बाजू मांडू नका, असे फडणवीस यांनीच सांगितल्याचे महाधिवक्ते आशितोष कुंभकोणी यांनीही जाहीरपणे सांगितले होते. फडणवीसांचे निकटवर्तीय गुणरत्न सदावर्ते हेही आरक्षणाविरोधात कोर्टात गेले होते. त्यामुळे आरक्षणप्रश्नी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे बोलले ते साफ खोटे आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.
जाणुनबुजून ‘फेक नरेटिव्ह’ - फडणवीस
आजपर्यंत मराठा समाजासाठी जे काही निर्णय झाले ते एकतर मी केले, माझ्यानंतर एकनाथ शिंदेंनी केले आणि शिंदेंच्या पाठीशी मी भक्कमपणे उभा राहिलो आहे. त्यामुळे अशाप्रकारे जाणीवपूर्वक ‘फेक नरेटिव्ह’ तयार करण्याचा प्रयत्न अतिशय अयोग्य आहे. मी पुन्हा सांगतो जर एकनाथ शिंदेंनी सांगितले की, मराठा आरक्षणासाठी त्यांना निर्णय घ्यायचा होता आणि त्या निर्णयामध्ये मी अडथळा निर्माण केला आहे, मी तो निर्णय होऊ दिला नाही. त्याचक्षणी मी राजीनामा देईन आणि राजकारणातून संन्यासही घेईन, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
जरांगेंचा आरोप
मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अडथळा निर्माण करत आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्याची इच्छा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे, मात्र देवेंद्र फडणवीस यात आडकाठी करत आहेत, असा थेट आरोप जरांगे-पाटील यांनी केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वात मोठा फटका बसणार असून देवेंद्र फडणवीस यांच्यावर पश्चात्ताप करण्याची वेळ येईल, असेही जरांगे-पाटील यांनी म्हटले आहे.
आरक्षणात फडणवीसांची मोलाची भूमिका - मुख्यमंत्री
मराठा समाजाला आरक्षण देण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोलाची भूमिका आहे. यापूर्वी देखील ते मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा समाजासाठी विविध योजना आणल्या. यावेळीदेखील आमच्या मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय एकमताने घेतला. त्यामुळे मराठा आरक्षणाला फडणवीसांचा विरोध आहे, असे म्हणणे चुकीचे आहे, अशी भूमिका मांडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे यांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले.