
छत्रपती संभाजीनगर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वास्तव्य राहिलेल्या छावणीतील बंगला नंबर ९ येथे बाबासाहेबांचे स्मारक उभारावे व या ठिकाणी अभ्यासिका बांधावी, अशी मागणी भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
भाजप प्रदेश सरचिटणीस तथा जिल्हा प्रभारी जालिंदर शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना मागणीचे निवेदन सादर केले. या निवेदनात म्हटले आहे, की भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मराठवाड्यामध्ये शिक्षणाची गंगा आणली येथेच मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. या महाविद्यालयाचे बांधकाम सुरू असताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर १९४५ ते १९५६ या कालावधीमध्ये छावणीतील बंगला नंबर ९ येथे वास्तव्यास होते. तेथेच त्यांनी रहिवासी महाविद्यालयही सुरू केले. त्यामुळे या पवित्र जागेला फार महत्त्व आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती संभाजीनगरामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये मिलिंद महाविद्यालयाची स्थापना करून मोठे कार्य केले आहे.
छावणी नगर परिषदेचे सध्या महापालिकेकडे वर्गीकरण होणार आहे. तेव्हा बंगला नंबर नऊ हा सुद्धा महापालिकेकडे वर्ग करून या बंगल्याचा ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारावे तसेच अभ्यासिका बांधावी. त्यासाठी दहा कोटीचा निधी मंजूर करावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी प्रदेश सरचिटणीस तथा जिल्हा प्रभारी जालिंदर शेंडगे, भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे शहराध्यक्ष बबन नरवाडे, शहर उपाध्यक्ष लक्ष्मण शिंदे आदि उपस्थित होते.