शिर्डी : राज्याच्या काही भागात पेट्रोल व डिझेलच्या मागणीत अचानक २० ते ३० टक्के वाढ झाली असून हा प्रकार संशयास्पद वाटतो, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी व्यक्त केले.
ग्रामीण भागात सध्या इंधनाचा तुटवडा जाणवत असताना, शेतकऱ्यांना डिझेलचा पुरवठा विनाव्यत्यय मिळावा, यासाठी आपण प्रशासनाला कडक सूचना दिल्या आहेत. असे नमूद करून ते म्हणाले की, मात्र शेतकऱ्यांच्या मागणीच्या नावाखाली कोणी गडबड करीत नाहीत ना हे तपासून पाहायला हवे.
मुख्यमंत्री एका संरक्षण आणि एरोस्पेस कॉम्प्लेक्सच्या उद्घाटनासाठी शिर्डीत आले होते. "सध्या ग्रामीण भागात पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध होण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे, सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना मी स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, जिथे गरज आहे तिथे शेतकऱ्यांसाठी डिझेल उपलब्ध करून दिले जावे" असे फडणवीस यांनी सांगितले.
शिर्डीतील संरक्षण कॉम्प्लेक्सबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले की, हे तीर्थक्षेत्र आता भक्ती आणि शक्ती अशा दोन्हीचे प्रतीक म्हणून उदयाला आले आहे. "शिर्डी आता शक्तीचे केंद्र बनले आहे, हे अत्यंत आनंदाची बाब आहे. भारतीय अध्यात्मात भक्ती आणि शक्ती एकरूप आहेत. केवळ शक्तिशाली लोकच शांती प्रस्थापित करू शकतात, दुर्बळ कधीही शांती प्रस्थापित करू शकत नाहीत," असे त्यांनी नमूद केले.
वंदे भारत रेल्वेचा अनुभव
या दौऱ्यासाठी वंदे भारत ट्रेनने प्रवास करणारे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या रेल्वे सेवेद्वारे देशाला एक "अद्वितीय भेट" दिली आहे, जी जगातील विकसित देशांच्या रेल्वे सेवेशी तुलना करण्यासारखी आहे. "मी प्रवासाचा खूप आनंद घेतला. प्रवासादरम्यान मी सरकारी फाइल्स निकाली काढल्या आणि अनेक लोकांशी संवाद साधला. हा अनुभव पूर्णपणे वेगळा आणि अतिशय सुखद होता," असेही ते म्हणाले.