मुंबई : विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींनी भरपूर दिले, त्यामुळे मला मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी मिळाली आणि या सर्वांच्या शिल्पकार लाडक्या बहिणी आहेत. लाडक्या बहिणी आनंदी आहेत, पण काही जण तोंडावर आपटले, मातीत मिळाले तरी सुधारायला तयार नाहीत. परदेशात भारताची बदनामी केली, बिहारमध्ये महाराष्ट्राची बदनामी केली, पण कोणी विचारले नाही. लाडक्या बहिणींच्या मतांना चोरी म्हणतात. मतांची चोरी नाही तर यांचे डोकेच चोरीला गेलेय, असा घणाघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांचे नाव न घेता केला.
दादर पूर्वेकडील योगी सभागृहात आयोजित रक्षाबंधन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, भाजप नेत्या चित्रा वाघ आदी उपस्थित होते. "देशाच्या विकासात महिलांचेही योगदान असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत या संकल्पनेला यशस्वी करण्यासाठी लोकसंख्येच्या तुलनेत महिलांचा ५० टक्के सहभाग असणे गरजेचे आहे.
महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना १५०० रुपये देऊन मर्यादित न ठेवता त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील ३६ लाख ७८ हजार बहिणींनी राखी पाठवल्या. याचा अर्थ लाडक्या बहिणींचे प्रेम सोबत आहे, त्यामुळे कौन क्या बिघाड लेगा," असा टोमणाही त्यांनी विरोधकांना लगावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी खूप योजना आणल्या आता तर २०२९ मध्ये निवडणुकीत महिलांचा सहभाग अधिक वाढणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी आतापर्यंत घरच्या गृहमंत्री होत्या २०२९ मध्ये राज्याच्या मंत्री होणार आहेत, असेही ते म्हणाले.
एक कोटी लखपती दीदी करणार!
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केंद्र सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांनी महिलांसाठी अनेक महत्त्वकांशी योजना आणल्या आहेत. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून महाराष्ट्र सरकारसुद्धा काम करत आहे. लाडकी बहीण योजनेतून नागपूरमध्ये स्मॉल फायनान्स काही महिलांनी सुरू केले. तेच मॉडेल आता राज्यभर सुरू करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लखपती दीदी योजना आणली होती. या योजनेच्या माध्यमातून २५ लाख महिला लखपती दीदी झाल्या. महाराष्ट्रात आम्ही एक कोटी लखपती दीदी केल्याशिवाय शांत बसणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
त्यांना भोपळाच मिळणार...
मुंबई महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ते एकत्र आले आहेत. त्यांची ही भाऊबंदकी त्यांना लखलाभ. परंतु एक योगायोग म्हणा किंवा यानिमित्ताने बेस्ट पतपेढी निवडणुकीची घटना समोर आली आणि यांना भोपळा मिळाला. तसेच आता महानगरपालिकेच्या निवडणुकीतही यांना भोपळाच मिळेल, असा टोला भाजप आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे बंधूंना लगावला.