

मुंबई : पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने समाजकारण, राजकारणात भरीव योगदान देणारे आणि या क्षेत्रातील अनेक संस्थांचे आधारवड ठरलेले कार्यतपस्वी नेतृत्व काळाने हिरावून नेले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिहार, पश्चिम बंगाल आणि त्रिपुराचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. डॉ. पाटील यांच्या निधनामुळे सामाजिक आणि राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाल्याचे फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
डॉ. पाटील यांनी ज्ञानदेव या आपल्या नावाप्रमाणेच ज्ञानाची आराधना केली. शिक्षण क्षेत्रालाच आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. एका छोट्याशा शाळेपासून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास थक्क करणारा आहे. सुमारे २०० संस्था, विविध प्रकारची आठ विद्यापीठे आणि हजारो विद्यार्थी, असा त्यांच्या कार्याचा विस्तार झाला. विशेषत: वैद्यकीय, अभियांत्रिकी, औषधनिर्माण, आर्किटेक्चर अशा वैविध्यपूर्ण अभ्यासक्रमांची महाविद्यालये आणि आधुनिक सुविधांच्या उभारणीतून त्यांनी आपल्या शैक्षणिक समुहासोबतच महाराष्ट्राचा नावलौकिक उंचावला, असे सांगत फडणवीस यांनी डॉ. पाटील यांच्या कार्याचा गौरव केला आहे.
डॉ. पाटील यांनी आयुष्यभर शिक्षण, सेवा आणि विनम्रतेची मूल्ये जपली. त्यांनी रुजवलेली शिक्षणसेवेची परंपरा, विनम्रतेचा आदर्श आणि समाजहिताची मूल्ये कायम प्रेरणादायी राहतील.
महाराष्ट्राने दूरदृष्टीचा शिक्षणमहर्षी गमावला : एकनाथ शिंदे
डॉ. डी. वाय. पाटील हे केवळ शिक्षणसंस्था उभारणारे प्रशासक नव्हते, तर समाजपरिवर्तनाचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून शिक्षणाला नवे क्षितिज देणारे दूरदृष्टीचे शिक्षणमहर्षी होते, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ. पाटील यांना श्रद्धांजली वाहिली आहे. डॉ. पाटील यांनी उभी केलेली शैक्षणिक चळवळ लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारी ठरली, असेही ते म्हणाले.
राष्ट्रनिर्मितीला वाहिलेले प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व हरपले : सुनेत्रा पवार
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद असून, त्यांच्या जाण्याने शिक्षण, समाजसेवा आणि सार्वजनिक जीवनाला दिशा देणारे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व हरपल्याची शोकभावना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.
दूरदर्शी शिक्षणतज्ज्ञ गमावला : मल्लिकार्जुन खर्गे
पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने एक दूरदर्शी शिक्षणतज्ज्ञ, लोकाभिमुख नेता आणि समाजसेवक गमावला आहे.
डॉ. पाटील यांचे संपूर्ण आयुष्य सार्वजनिक सेवेच्या सर्वोच्च मूल्यांचे प्रतीक होते, अशा शब्दात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी डॉ. पाटील यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.