"ठाकरे पिता-पुत्रांना तुरुंगात टाकण्याचा देवेंद्र फडणवीसांचा डाव..." अंनिसच्या श्याम मानवांचा गंभीर आरोप

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे,अनिल परब तसेच अजित पवार यांना तुरुंगात टाकण्याचा डाव होता, असं श्याम मानव म्हणाले.
"ठाकरे पिता-पुत्रांना तुरुंगात टाकण्याचा देवेंद्र फडणवीसांचा डाव..." अंनिसच्या श्याम मानवांचा गंभीर आरोप
Published on

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांनी देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत. राज्यातील चार बड्या नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा डाव आखण्यात आला होता. यामध्ये शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, शिवसेना उबाठाचे नेते अनिल परब तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा समावेश होता, असं शाम मानव म्हणाले. त्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीचा धाक दाखवून चार खोट्या शपथपत्रांवर सही करण्यास सांगितलं होतं, परतु त्यांनी सही करण्यास नकार दिल्यामुळं त्यांना जेलमध्ये जावं लागलं, असा दावा त्यांनी केला. अनिल देशमुख तेव्हा आत्महत्या करण्याच्या मनस्थितीत गेले होते, असंही श्याम मानव यांनी म्हटलं आहे. तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली. श्याम मानव यांनी सत्य सांगितलं असल्याचं ते म्हणाले.

अनिल देशमुखांना 'या' प्रतिज्ञापत्रांवर सह्या करण्यासाठी होता दबाव:

१) पहिलं प्रतिज्ञापत्र: तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनिल देशमुख यांना मातोश्रीवर बोलावून दरमहा १०० कोटी रुपये गोळा करण्याचा आदेश दिला.

२) दुसरं प्रतिज्ञापत्र: आदित्य ठाकरेंनी दिशा सालियनवर बलात्कार केला आणि त्यानंतर तिचा खून केला.

३) तिसरं प्रतिज्ञापत्र: अनिल परब यांनी काही बेकायदेशीर बांधकामं आहेत.

४) चौथ्या प्रतिज्ञापत्र: अजित पवारांनी अनिल देशमुखांना देवगिरी बंगल्यावर बोलवलं. त्यावेळी अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार उपस्थित होते. त्यांनी गुटखा विक्री करणाऱ्यांकडून पैसे गोळा करायला सांगितलं.

अनिल देशमुख आत्महत्या करण्याच्या विचारात होते...

श्याम मानव म्हणाले की, “अनिल देशमुख इतका दबाव होता, कुटुंबाचा प्रश्न होता, त्यांच्या राजकीय भवितव्याचा प्रश्न होता. त्यांनी या प्रश्नी खूप विचार केला, त्यानंतर निर्णय घेतला की माझ्यामुळे तीन निरपराध माणसं तुरुंगात जातील, हे आपल्याला मान्य नाही. त्यावेळी ते अशा पर्यायापर्यंत आले होते की, आत्महत्या करावी. पण त्यांनी सुदैवाने तसं पाऊल उचललं नाही. त्यांनी कुठल्याही प्रतिज्ञापत्रावर सही केली नाही. त्यानंतर अनिल देशमुखांना १३ महिने तुरुंगात जावं लागलं.”

श्याम मानव म्हणाले ते सत्य...

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी श्याम मानव यांच्या वक्तव्यावर भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, “काल श्माम मानव यांनी जे सांगितलं, ते सत्य आहे. तीन वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याकडे एक माणूस पाठवून चार प्रतिज्ञापत्र करून द्या, असं सांगितलं. उद्धव ठाकरेंवर आरोप करा, आदित्य ठाकरेंवर आरोप करा, अजित पवारांवर आरोप करा, अनिल परबांवर आरोप करा, अशा पद्धतीची प्रतिज्ञापत्र माझ्याकडे पाठवली होती. देवेंद्र फडणवीस यांच्या दबावाला तीन वर्षापूर्वी बळी पडलो नाही आणि प्रतिज्ञापत्र करण्यास नकार दिला त्यामुळं माझ्यामागे ईडी, सीबीआय लावून मला जेलमध्ये टाकण्यात आलं.“

logo
marathi.freepressjournal.in