अजितदादांनी 'ती' गोष्ट मला सांगितली नसती का? 'राष्ट्रवादी'च्या विलीनीकरणाच्या मुद्द्याबाबत देवेंद्र फडणवीस यांचा सवाल

देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले की, ‘अजित पवार आणि शरद पवार यांच्या दरम्यान याबाबत काय बोलणे झाले हे मला माहिती नाही. विलीनीकरणाची घोषणा करण्याबाबतची कोणती तारीख ठरली होती, त्याची माहिती आपल्याला नाही.
देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीससंग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : 'अजित पवार हे आमच्या सरकारमध्ये होते. माझ्याशी त्यांचे व्यक्तिगतही खूप चांगले संबंध होते. ते सर्व गोष्टी माझ्याशी शेअर करायचे. जर समजा अजित पवार दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाची चर्चा करत असतील, एकत्रीकरणाची तारीखही ठरली असेल तर ते मला सांगणार नाहीत का? किंबहुना एकत्रीकरणाची चर्चा भाजपसोबत त्यांनी केली नसत का?’, असे सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी उपस्थित केले.

देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले की, ‘अजित पवार आणि शरद पवार यांच्या दरम्यान याबाबत काय बोलणे झाले हे मला माहिती नाही. विलीनीकरणाची घोषणा करण्याबाबतची कोणती तारीख ठरली होती, त्याची माहिती आपल्याला नाही. अशावेळी राजकारण करणे मला योग्य वाटत नाही. नाहीतर मी देखील अनेक गोष्टी सांगू शकतो. पण ते मी करणार नाही’, असेही फडणवीस म्हणाले. अजित पवार यांच्या पश्चात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेने जोर धरला आहे. अजित पवार हयात असताना अशी चर्चा सुरू झाली होती. याबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणाची चर्चा करत होते, तर मग सरकारमधून ते बाहेर पडणार होते का? राज्य सरकार तर स्थिर आहे. पण, आपली इकोसिस्टिम वापरून काही जण संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच एकत्रीकरणाची चर्चा जर अंतिम टप्प्यात आली होती, तारीखही ठरली होती तर आम्हाला निश्चित सांगितले असते. त्यांचे आणि शरद पवारांचे काय बोलणे झाले मला माहिती नाही. पण अशा प्रकारची तारीख ठरल्याची मला माहिती नाही’, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

जिल्हा परिषद निवडणूक प्रचारात नाही

जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारात मी उतरणार नाही. या परिस्थितीत प्रचाराला उतरणे मला योग्य वाटले नाही. निवडणुका येतात आणि जातात. या निवडणुकीसाठी पक्ष आणि पक्षातील नेते सक्षम आहेत. रवींद्र चव्हाण यांच्याशीही मी याबाबत बोललो आहे. मी प्रचाराला न जाणे हेच योग्य आहे. महायुतीला मतदान करा, असे आवाहन फक्त करेन’, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

अपघाताचे सत्य बाहेर येईलच

‘अजितदादांच्या विमान अपघाताची चौकशी डीजीसीएकडून सुरू आहे. विमानाचा ब्लॅक बॉक्सही सापडला आहे. पायलट कम्युनिकेशन देखील सापडले आहे. त्यातून सर्व गोष्टी स्पष्ट होतील आणि सत्य बाहेर येईलच, असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in