गाडीखाली श्वान आला तरी माझाच राजीनामा मागतील, राजकीय रंग नको; घोसाळकर हत्या वैयक्तिक वैमनस्यातून: फडणवीस

"ही घटना गंभीरच आहे. पण, आमच्या विरोधी पक्षाची स्थिती अशी आहे की एखाद्या गाडीखाली जर श्वान आले तरी ते गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील, त्यामुळे...
गाडीखाली श्वान आला तरी माझाच राजीनामा मागतील, राजकीय रंग नको; घोसाळकर हत्या वैयक्तिक वैमनस्यातून: फडणवीस

"ही घटना (अभिषेक घोसाळकर हत्या) गंभीरच आहे. पण, आता तर आमच्या विरोधी पक्षाची स्थिती अशी आहे की एखाद्या गाडीखाली जर श्वान आले तरी ते गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील, त्यामुळे या गंभीर घटनेकरता त्यांनी राजीनामा मागितला तर आश्चर्य वाटत नाही. ही हत्या वैयक्तिक वैमनस्यातून झालेली आहे, हे त्यांनाही माहितीये, पण त्यांना या घटनेचं राजकारण करायचंय", असे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी फेसबुक लाइव्ह दरम्यान मॉरिस नोरोन्हा नावाच्या व्यक्तीने गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर त्याने स्वतःही आत्महत्या केली. यानंतर राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे का? असा सवाल विचारत विरोधक गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. त्यावर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आणि घटनेबाबत माहितीही दिली.

"काल घडलेली अभिषेक घोसाळकर यांच्यासंदर्भातील घटना दुःखद आहे. तरुण नेत्याचं अशाप्रकारे निधन होणं अत्यंत गंभीर आहे. काही लोक या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत ते योग्य नाही. ही गंभीर घटना असली तरी 2024 मधील दोघांचेही एकत्र पोस्टर पाहायला मिळाले आहेत. वर्षानुवर्षे त्यांनी एकत्र काम केलंय. कोणत्या विषयातून त्यांच्यात इतका बेबनाव झाला की मॉरिसनी घोसाळकारांना गोळा मारल्या आणि स्वतःही गोळ्या मारून घेतल्या, त्याची चौकशी सुरू आहे. बऱ्याच गोष्टी पोलिसांच्या लक्षात आल्या आहेत. त्या योग्यवेळेस उघड केल्या जातील. त्याची जी कारणं लक्षात येत आहेत ती वेगवेगळी आहेत. एकदा सर्व कारणांची पुष्टी झाली की त्याची माहितीही दिली जाईल", असे फडणवीस म्हणाले.

पुढे बोलताना, "ही घटना गंभीर आहे. अशा घटनेचं राजकारण करणं योग्य नाही आणि या घटनेमुळे कायदा-सुव्यवस्था संपलेली आहे अशाप्रकारची विधानं करणं हे देखील चुकीचं आहे. कारण वैयक्तिक वैमनस्यातून घडलेली ही घटना आहे. तथापि, बंदूका आणि बंदूकीचं लायसन्स देताना काय खबरदारी घेतली पाहिजे याचा विचार राज्य सरकार करेल", अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

दरम्यान, मॉरिस हा दहिसर-बोरिवली परिसरात स्वयंसेवी संघटना चालवत होता. स्थानिक राजकीय वर्तुळात मॉरिस स्वयंघोषित नेता म्हणून ओळखला जात होता. गणपत पाटील नगरमध्ये मॉरिस काम करत होता. अभिषेक घोसाळकर आणि मॉरिसमध्ये वर्षापूर्वी टोकाचा वाद झाला होता. मात्र, त्यांची पुन्हा मैत्री झाली होती. दोघांमध्ये पैशांवरून वाद होता, अशीही माहिती समोर आली आहे. मॉरिसच्या समोर आलेल्या फोटोनुसार तो निवडणुकीसाठी तयारी करत असल्याचे दिसून येते. याशिवाय, मॉरिसविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा एक गुन्हा दाखल होता, याच गुन्ह्यात तो जामिनावर होता. अभिषेकच्या सांगण्यावरून मॉरिसवर एमएचबी पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचाराचा एक गुन्हा दाखल झाला होता. याच गुन्ह्यांत त्याला पोलिसांनी अटक केली होती. काही दिवस जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत राहिल्यानंतर त्याला कोर्टाने जामीन मंजूर केला होता. हा राग त्याच्या मनात होता. गुरुवारी सायंकाळी अभिषेक घोसाळकर हे मॉरिसच्या दहिसर येथील एमएचबी, आयसी कॉलनीतील कार्यालयात आले होते. यावेळी या दोघांनी आपसांतील वाद मिटवून पुन्हा एकत्र काम करण्याचा निर्धार केला. त्यानंतर ते दोघेही फेसबुक लाईव्हमध्ये आले आणि इथेच मॉरिसने आधी घोसाळकरांना आणि नंतर स्वतःलाही संपवले. लैंगिक अत्याचाराची खोटी तक्रार केल्याच्या रागातून हा प्रकार घडल्याचे बोलले जाते.

logo
marathi.freepressjournal.in