अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या श्याम मानव यांनी काल देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब तसेच अजित पवार यांना तुरुंगात टाकण्याचा फडणवीस यांचा डाव होता. त्यासाठी त्यांनी ईडी, सीबीआयचा धाक दाखवून तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना चार खोट्या शपथपत्रांवर सह्या करण्यासाठी दबाव आणल्याचं श्याम मानव म्हणाले होते. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही श्याम मानव यांनी सांगितलं ते सत्य आहे, असं म्हणत दुजोरा दिला. दरम्यान आज देवेंद्र फडणवीस यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
आरोप करण्यापूर्वी मला विचारायला हवे होते...
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “ इतकी वर्ष श्याम मानव मला ओळखतात. त्यामुळं त्यांनी माझ्यावर अशाप्रकारचे आरोप करण्यापूर्वी पहिल्यांदा मला विचारायला हवे होते. पण दुर्दैवाने मला असं वाटतं की, इकोसिस्टिममध्ये अलीकडे सुपारी घेऊन बोलणारे लोक घुसलेले आहेत. दुर्दैवाने श्याम मानव हे त्यांच्या नादी लागले का? असा प्रश्न मला पडतो. पण एक गोष्ट मला स्पष्टपणे सांगायची आहे की, अनिल देशमुख यांच्यावर आरोप लागले तेव्हा आमचं सरकार नव्हतं, मविआच्या काळात झाले होते. ही केस मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांसमोर गेली. मुख्य न्यायाधीशांनी अनिल देशमुख यांच्याविरुद्ध एफआयआर करायला लावला. त्यांच्याच सरकारमध्ये तो एफआयआर झाला. त्यानंतर ते जेलमध्ये गेले आणि ते आता जामिनावर बाहेर आहेत, ते सुटलेले नाहीत. १०० कोटींच्या वसुलीप्रकरणी ते जामिनावर बाहेर आलेले आहेत.“
कुणी माझ्या नादी लागले तर...
“मी एक गोष्टपणे स्पष्टपणे सांगतोत. मी आजवर बोललो नव्हतो. अनिल देशमुख सातत्याने माझ्यावर आरोप करत आहेत. तरीही मी कधी बोललो नाही. कारण मी कुणावरही डुख धरून राजकारण करत नाही. पण माझा एक सिद्धांत आहे. मी कुणाच्या नादी लागत नाही, कुणी माझ्या नादी लागले तर सोडत नाही.”
अनिल देशमुख यांचे अनेक ऑडिओ व्हिज्युअल्स माझ्याकडे...
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, “मी आज स्पष्टपणे सांगतो. अनिल देशमुख यांच्याच पक्षातील लोकांनी त्यांचे ऑडिओ व्हिज्युअल्स माझ्याकडे आणून दिले आहे. त्यात उद्धव ठाकरे, शरद पवार, माझ्यासंदर्भात काय बोलतायत, वाझेबद्दल काय बोलतायत, या सगळ्या गोष्टी आहेत. माझ्यावर वेळ आली तर मला त्या पब्लिक कराव्या लागतील. जर रोज खोटे बोलून कुणी नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी, देवेंद्र फडणवीस कधीच पुराव्याशिवाय बोलत नाही.”