

चंद्रपूर : मनपा निवडणुकांमध्ये महायुतीच्या काही उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याने त्याला आव्हान देण्यासाठी विरोधी पक्षांनी न्यायालयात धाव घेतली, तरीही जनतेचा कौल कायम राहील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सांगितले.
मनपा निवडणुकीत महायुतीने ६८ जागा बिनविरोध जिंकल्या आहेत. चंद्रपूर येथे रोड शोदरम्यान पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, ‘विरोधक नक्कीच न्यायालयात जाऊ शकतात, पण जनतेच्या न्यायालयाने आम्हाला निवडून दिले आहे. विरोधकांनी न्यायालयात दाद मागितली, तरी न्यायालयातही जनतेचाच कौल मान्य केला जाईल. अनेक अपक्ष तसेच मुस्लिम उमेदवारही बिनविरोध निवडून आले आहेत. ‘त्यांच्याबद्दल विरोधक का बोलत नाहीत? कारण त्यांना आपला पराभव स्पष्ट दिसत आहे आणि आता ते कारणे शोधत आहेत,’ असे मुख्यमंत्री म्हणाले.
‘मामूउद्धवजी’ असा उल्लेख
मुंबईतील कांदिवली भागात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, “आज सकाळी एक वचननामा जाहीर झाला. मला आश्चर्य वाटते की, काल आई जिजाऊंची जयंती होती. कालही हा वचननामा जाहीर करता आला असता. मात्र, अलिकडच्या काळात ज्यांना ‘वंदे मातरम’ची अॅलर्जी आहे, अशा काही लोकांबरोबर आमचे काही जुने मित्र बसायला लागले आहेत. त्यामुळे त्यांना आता कशा-कशाची अॅलर्जी होते, हे मला सांगण्याची गरज नाही. आज आमचे मामु, मामु म्हणजे माजी मुख्यमंत्री, आमचे मामू उद्धवजी आणि नव्याने प्रेम उफाळलेले राजजी यांनी आज एक वचननामा जाहीर केला. पहिल्यांदा तर मी एक सांगतो की वचननामा देण्याचा अधिकार हा फक्त बाळासाहेब ठाकरे यांनाच होता. आज जाहीर झालेला वचननामा नव्हता, तर तो ‘वाचूननामा’ होता, तरीही त्यांनी त्यात काय वाचले ते त्यांनाही माहिती नाही”, अशी टीका फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर केली.