शरद पवारांचाच मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध, फडणवीसांचा आरोप; म्हणाले, “भाजपाची कमिटमेंट ओबीसींशी…”

मराठा आरक्षणाला सर्वात मोठा विरोध हा शरद पवार यांनीच केला. त्यांच्या मनात असतं तर मंडल आयोग लागू झाला, तेव्हाच...
शरद पवारांचाच मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध, फडणवीसांचा आरोप; म्हणाले, “भाजपाची कमिटमेंट ओबीसींशी…”

मराठा आरक्षणाला शरद पवार यांचाच सर्वाधिक विरोध होता. शरद पवार यांनीच मराठा आरक्षणाला आतापर्यंत विरोध केला आहे, असा गंभीर आरोप राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केला. ते नागपूर येथे भाजपाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या ‘महाविजय २०२४’ मेळाव्यात फडणवीसांनी विरोधकांवर टीकास्र सोडले आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही ते प्रचंड आक्रमक झाले.

आज राज्यभरात मराठा आरक्षणासाठी मोठी आंदोलनं सुरु आहेत. परंतु, मराठा आरक्षणाचा इतिहास काढून बघितला तर कळेल की, मराठा आरक्षणाला सर्वात मोठा विरोध हा शरद पवार यांनीच केला. त्यांच्या मनात असतं तर मंडल आयोग लागू झाला, तेव्हाच त्यांनी मराठा आरक्षण दिले असते. पण त्यांना कधी आरक्षण द्यायचंच नव्हतं. त्यांना केवळ विविध समाजांना झुंजवत ठेवण्यात जास्त रस आहे. लोक झुंजत राहिले तर नेतेपद राहील, ही त्यांची मानसिकता आहे. त्यामुळे पवारांनी लोकांना सतत झुंजवत ठेवण्याचे काम केले, असे फडणवीस म्हणाले.

आमचे सरकार असताना आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिले. केवळ आरक्षण दिले नाही, तर ते उच्च न्यायालयात टिकवून दाखविले. सर्वोच्च न्यायलायात आपले सरकार असेपर्यंत ते टिकले. पण सरकार गेल्यानंतर त्यावर स्थगिती आली”, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच, मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाहीत का असं सुप्रिया सुळे महाविकास आघाडीचं सरकार असताना म्हणायच्या. दोघांनाही मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नव्हतं. त्यांना समाजाला झुंजत ठेवायचं होतं, असा दावाही फडणवीसांनी केला.

मराठा समाजाला टिकणारं आरक्षण द्यायचं आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात हा प्रयत्न सुरू आहे. पण कुठल्याही परिस्थितीत ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का लागू देणार नाही. भाजपाची कमिटमेंट ओबीसी समाजाशी आहे. काहीही झाले तरी ओबीसी समजाचे आरक्षण टिकवणारच, असं सांगतानाच कार्यकर्त्यांमध्ये जातीचे गट तयार होऊ देऊ नका. ओबीसी आणि मराठा समाजाच्या मनात तेवढीच कमिटमेंट हवी. मराठा समाजाला आम्ही न्याय देणार आहोत. पण ओबीसींवर अन्याय होऊ द्यायचा नाही. भाजपाच्या ओबीसी आणि मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र राहिले पाहिजे. विभाजनाचे लोण पसरू देऊ नये”, असे आवाहन देखील फडणवीस यांनी केले.

यावेळी फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधत “मला तर आश्चर्य वाटते, उद्धव ठाकरे आरक्षणावर बोलतात. मंडल आयोगाच्यावेळी ओबीसी आरक्षणाच्या विरोधात तेव्हाच्या शिवसेनेने भूमिका घेतली होती. याच मुद्द्यावरून तर भुजबळ शिवसेनेच्या बाहेर पडले होते आणि आता कुठल्या तोंडाने तुम्ही आरक्षाणाची मागणी करता.” असे ते म्हणाले. महाराष्ट्रातील विरोधी पक्ष चुकीच्या मानसिकतेत गेला आहे. त्यांना फक्त सत्तेची चिंता लागली आहे. म्हणून त्यांच्याकडून देशाचा, राज्याचा विचार होताना दिसत नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

logo
marathi.freepressjournal.in