“देवेंद्र फडणवीसांमुळे राज्यात डर्टी पॉलिटिक्स सुरु झालं...” संजय राऊत यांचा आरोप

नरेंद्र मोदी-अमित शहा यांनी देशात आणि देवेंद्र फडणवीसांनी राज्यात डर्टी पॉलिटिक्स सुरु केलं, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.
“देवेंद्र फडणवीसांमुळे राज्यात डर्टी पॉलिटिक्स सुरु झालं...” संजय राऊत यांचा आरोप
Published on

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका केली आहे. देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं अधःपतन करून राज्यात डर्टी पॉलिटिक्स सुरु केलं, असं संजय राऊत म्हणाले. अंनिसचे श्याम मानव आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले होते. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब तसेच अजित पवार यांना अटक करण्याचा फडणवीसांचा डाव होता, अशी टीका त्यांनी केली होती. या आरोपांना प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडे अनिल देशमुख यांच्या क्लिप्स आहेत, असं म्हटलं होतं. फडणवीसांच्या या विधानाचा संजय राऊतांनी चांगलाच समाचार घेतला.

संजय राऊत म्हणाले की, “भाजपाने आयुष्यभर दुसऱ्यांच्या क्लिप्स बनवण्यातच धन्यता मानली. भाजपाचा क्लिप्सचा कारखाना आहे. तेच त्यांच्या राजकारणाचं सूत्र आहे. क्लिप्स बनवा, लोकांचे फोन रेकॉर्डिंग करा. विरोधी पक्षांचे फोन रेकॉर्डिंग करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला जर देवेंद्र फडणवीस राज्याच्या पोलीस महासंचालक बनवून प्रतिष्ठा देत असतील तर क्लिप्सचं काय घेऊन बसलात? आमच्या सगळ्यांचे फोन ज्यांनी चोरुन ऐकले. चोरून ऐकायला दिले. अशा पोलीस अधिकाऱ्याला ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत, त्यांना निलंबित केलं जाणार होतं. अशा अधिकाऱ्याला सरकार बदलल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचं पोलीस महासंचालक केलं. त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार?”

संजय राऊत म्हणाले की, “भाजपच्या लोकांनी देशात आणि राज्य पातळीवर सर्वत्र याची क्लिप बनवा, त्याची क्लिप बनवा हे सुरु केलं. ही काय राज्याची संस्कृती आहे का? मी नेहमी म्हणतो, या महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचे अधःपतन कुणी केलं असेल, तर त्याला जबाबदार देवेंद्र फडणवीस आणि त्यांची टोळी आहे. फक्त लोकांचे फोन टॅप करा, त्यांच्या क्लिप्स बनवा. अभिमानाने सांगतात मी माणसं फोडली, क्लिप्स तयार केल्या. गृहमंत्र्यांना शोभतं का हे? मला तर वाटतं की, नरेंद्र मोदी ज्याप्रमाणे नॉन बायलॉजिकल पंतप्रधान आहेत तसंच महाराष्ट्राला नॉन बायलॉजिकल गृहमंत्री मिळाला आहे. या भूमीवरचा माणूस नाही, वरुनच पडला आहे हा माणूस. या राज्याच्या राजकाणाची प्रतिष्ठा ठेवणार की नाही? तुम्ही या राज्याची प्रतिष्ठा ठेवा, स्वतःची प्रतिष्ठेविषयी मी म्हणत नाही, कारण ती नाहीच आहे. या महाराष्ट्रामध्ये ७०-७५ वर्षांपासून राजकारण झालं. पण अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण, डर्टी पॉलिटिक्स हे गेल्या पाच-दहा वर्षांत देशात नरेंद्र मोदी आणि शाह आल्यापासून आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचा उदय झाल्यापासून अशा प्रकारचं डर्टी पॉलिटिक्स, गटारी पद्धतीचं राजकारण हे सुरु झालं आहे.”

ते पुढे म्हणाले की, ”ज्यांना अटक करायला पाहिजे, त्यांना संसदेत बसवलंय. ज्यांना तुरुंगात पाठवायला पाहिजे, असे इतर पक्षातील सर्व लोक भाजपनं आपल्याकडे घेतले आहेत. त्यांना मंत्रिमंडळात घेतलंय. ते राज्यसभेत आहेत, ते लोकसभेत आहेत. ज्यांची तुम्हाला भीती वाटते, अशा अरविंद केजरीवाल यांच्यासारख्या नेत्यांना तुम्ही तुरुंगात टाकलं. त्यांना तुम्ही जामीन मिळू देत नाहीये. हा सत्तेचा आणि न्यायव्यवस्थेचा गैरवापर आहे. आपली न्यायव्यवस्था नादान झालीये त्यामुळं हे घडतंय.”

logo
marathi.freepressjournal.in