

नाशिक : राज्यातील ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी ग्रामपंचायतींनी लोकसहभागातून विकासकामांना गती द्यावी. तसेच पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी जलसंधारण आणि पाण्याच्या योग्य नियोजनाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नाशिक येथे आयोजित मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला राज्यभरातील सुमारे १० हजार सरपंच, ग्रामसेवक, ग्रामस्थ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
ग्रामीण विकास, जलसंधारण, पाणी व्यवस्थापन आणि लोकसहभाग या विषयांवर भर देत या कार्यक्रमातून ग्रामपंचायतींच्या विकासकामांना गती देण्याचा आणि शाश्वत जलव्यवस्थापनासाठी गावपातळीवरील नियोजन अधिक सक्षम करण्याचा संदेश देण्यात आला.
प्रत्येक गावाने ‘वॉटर बजेट’ तयार करावे
राज्यातील अनेक भागांना दुष्काळ आणि पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने गावपातळीवर जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबविणे आवश्यक आहे.
पावसाचे पाणी अडविणे, जमिनीत जिरविणे, भूजल पातळी वाढविणे आणि उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन करणे या उपाययोजनांवर भर देण्याची गरज आहे. प्रत्येक गावाने पाण्याची उपलब्धता आणि गरज लक्षात घेऊन ‘वॉटर बजेट’ तयार करावे. पाण्याचा वापर, साठवण आणि पुनर्भरण यांचे नियोजन करून जलव्यवस्थापनात ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग वाढवावा. लोकसहभागातून जलसंधारणाची कामे केल्यास ग्रामीण भागातील पाणीटंचाई कमी करण्यास मदत होईल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.
नागरिकांशी थेट संवाद साधण्यावर भर
कार्यक्रमादरम्यान व्यासपीठ आणि उपस्थित नागरिक यांच्यात ठेवण्यात आलेल्या अंतरावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली. नागरिकांच्या समस्या समजून घेण्यासाठी आणि त्यांच्याशी थेट संवाद साधण्यासाठी अशा कार्यक्रमांमध्ये हे अंतर कमी ठेवावे, अशी सूचना त्यांनी पोलिसांना केली.
शेतकऱ्यांना मदतीसाठी सरकार कटिबद्ध
राज्यात पावसाची तूट आणि खरीप पिकांचे नुकसान यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर भाष्य करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला. राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक शेतकऱ्याला मदत करण्याची जबाबदारी सरकारची आहे. धरणांमध्ये उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्याचा योग्य वापर करावा, धरणांमधील गाळ काढण्याची कामे हाती घ्यावीत आणि पावसाचा प्रत्येक थेंब जपावा, असे आवाहन त्यांनी केले. संकटकाळात शेतकरी आणि शेतमजुरांना अन्नधान्य उपलब्ध करून दिले जाईल.