
पुणे : देशाच्या सुरक्षेसाठी कडक निर्णय घ्यावे लागतात. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी लोकांना देश सोडण्याची नोटीस दिली आहे. त्यांना परत जाण्याच्या सूचनाही करण्यात आलेल्या आहेत. ४८ तासात ते देश सोडून न गेल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिला. दहशतवादी विरोधात लढण्याचा आमचा इरादा अजून मजबूत झाला असल्याचे त्यांनी म्हटले. सिंधू नदी कराराबाबत बोलतांना ते म्हणाले, पाकिस्तानमध्ये तीन-चार पाणी योजना सुरू आहेत. एका दिवसात हे सगळे होत नाही. ज्या पाण्यावर पाकिस्तान अवलंबून आहे, ते जर बंद केले तर पाण्याविना ते तडफडतील.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा कुटुंबातील व्यक्तींना जीव गमवावा लागला आहे. या सहा परिवाराला निश्चित मदत केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. आसावरी जगदाळे यांनी केलेल्या वर्णनामुळे मन हेलावून जाणारा असून हे सगळे अनाकलनीय असल्याचे ते म्हणाले.
बेकायदा पाकिस्तानी सापडतील, त्यांना ४८ तासात पाठवण्याची प्रक्रिया होईल. मात्र जे बेकायदेशीर राहतील ते सुद्धा सापडतील. ज्या पद्धतीने बांगलादेशी सापडले तसेच बेकायदा पाकिस्तानी सुद्धा सापडतील असे त्यांनी सांगितले.
यावेळी गणबोटे यांच्या गंगानगर कोंढवा येथील घरी नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार योगेश टिळेकर, सुनील कांबळे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नी संगीता गणबोटे, मुलगा तुषार, कुणाल, स्नुषा कोमल गणबोटे उपस्थित होते. जगदाळे यांच्या कर्वेनगर येथील निवासस्थानी राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, सुनील कांबळे, स्व. संतोष जगदाळे यांच्या पत्नी प्रगती जगदाळे, मुलगी आशावरी जगदाळे आदी कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. यावेळी गणबोटे यांच्या पत्नी आणि मुलांनी तसेच जगदाळे यांच्या पत्नी आणि मुलगी यांनी घडलेल्या घटनेबाबत सविस्तर माहिती सांगितली.
मृत पर्यटकांच्या कुटुंबीयांचे सांत्वन
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे या पर्यटकांच्या घरी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. आतापर्यंत ज्याप्रमाणे आपण खंबीर राहिले त्याचप्रमाणेच यापुढेही खंबीर राहावे, राज्य शासन आपल्या दुःखात सहभागी असून आपल्या पाठीशी आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना धीर दिला.
कागदी घोडे नाचवणे थांबवा, ठोस कारवाई करा - प्रकाश आंबेडकर
पुणे : राज्यकर्ते केवळ कागदी घोडे नाचवत आहेत. पण, आता हे थांबवा. ठोस कारवाई करा. दहशतवाद्यांची ट्रेनिंग सेंटर उद्ध्वस्त करा, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी पत्रकार परिषदेत दिला.
याबाबत बोलताना आंबेडकर म्हणाले, तुम्ही एवढी हत्यारे, विकत घेता. पाणबुड्या घेता. जहाजे निर्माण करता पण, त्या सगळ्यांचा उपयोग काय? पहलगाम हल्ल्यानंतर तुम्ही ठोस ॲक्शन घेणार आहात का? कागदी घोडे नाचवणे थांबवा, ठोस कारवाई तुम्ही करणार आहात का? जे काही दिसते, त्याला आर्मी उत्तर द्यायला तयार आहे. दहशतवादाविरोधात विविध देशांनी भारताला पाठिंबा दर्शवला आहे, तरीसुद्धा कारवाई होत नाही. पाणी करार स्थगित करणार मग नद्यांचे पाणी वापरणार कसे, अडवणार कसे, याचेही उत्तर मिळायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
काही नेत्यांचा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न
धर्म विचारून गोळी मारली, यावर काही होय म्हणतात, तर काही नाही म्हणतात. मात्र, काही राजकीय नेते नरेटिव्ह सेट करत आहेत. गेले ते भारतीय आहेत. ख्रिश्चन, मुस्लिम पण मारले गेले आहेत, असे सांगत सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान जात नाहीत. म्हणजे ते किती गंभीर आहेत, हे लक्षात येते. मी बैठकीत असतो, तर वॉक आऊट केले असते. सरकारने पर्यटकांना बाहेर काढणे, ही चूक केली. खरे तर त्यांना सपोर्ट द्यायला हवा होता. पर्यटकांच्या मनात भीती नव्हती. त्यांना सुरक्षा मिळणार की नाही, हा प्रश्न होता. सरकारने पर्यटकांचा खर्च करायला हवा होता, असे आंबेडकर यांनी यावेळी सांगितले.