मुंबई : मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरविण्याबाबत महाविकास आघाडीमध्ये विविध मतमतांतरे असतानाच महायुतीमध्येही चित्र फारसे वेगळे असल्याचे दिसून येत नाही. शुक्रवारी एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात सहभागी होत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्ही निवडणुका एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच लढवणार आहोत, पण त्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार हे आपण सांगू शकत नाही.
मुख्यमंत्री ठरविण्याचे अधिकार भाजपच्या संसदीय मंडळाला आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) आहेत. घटक पक्षांत मात्र या विषयावर कसलेही मतभेद नसल्याचे फडणवीस यांनी आवर्जून नमूद केले. एकनाथ शिंदे हे सरकारचे नेतृत्व करत आहेत आणि निवडणुका मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालीच लढविल्या जात असतात. असे सांगून ते म्हणाले की, भाजपच्या संसदीय मंडळाचा जो काही निर्णय असेल तो आमच्यासाठी स्वीकारार्ह असेल. शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाबाबत केंद्रीय नेतृत्वाकडून काही आश्वासन दिले आहे का, असे विचारल्यानंतर फडणवीस म्हणाले की, जर तशी काही चर्चा झाली असेल तर ती कालांतराने आमच्यासमोर येईल आणि आम्ही त्यावर निर्णय घेऊ.
उद्धव ठाकरे यांना टोमणा
महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरविण्यावरून सुरू असलेल्या चर्चेबाबत प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की, शरद पवार यांच्यासमोर मुख्यमंत्रीपदासाठी तीन-चार चेहरे असतील तर त्यात उद्धव ठाकरे यांचा चेहरा निश्चित नसणार. आपले नाव या पदासाठी जाहीर व्हावे म्हणून ते तीन-चार दिवस दिल्लीत होते. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांचीही त्यांनी भेट घेतली, पण त्या भेटीचे फोटोसुद्धा त्यांनी काढू दिले नाहीत, असा दावा फडणवीस यांनी केला.
नंतर याच वाहिनीच्या कार्यक्रमात आदित्य ठाकरे हेही सहभागी झाले होते. त्यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले की, जर उद्धव ठाकरे यांचा चेहरा समोर नसेल तर महायुतीच्या नेत्यांसमोर देवेंद्र फडणवीस यांचाही चेहरा मुख्यमंत्रीपदासाठी नसेल.
बहिणींना सगळे भाऊ सारखेच फडणवीस
'लाडकी बहीण योजने'वरून तिन्ही पक्षांत कुठलाही वाद नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली की वेगवेगळ्या पद्धतीने योजनांची प्रसिद्धी सुरू आहे. परंतु प्रसिद्धी करताना तिन्ही पक्षांनी एकसारखीच करावी, अशी सूचना मंत्रिमंडळाच्या बैठकीत केल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
मुख्यमंत्री हे प्रमुख असल्याने या योजनेचे नाव 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' आहे. त्यामुळे 'महायुती' सरकारची ही लाडकी बहीण योजना आहे. बहिणींना सगळे भाऊ सारखेच असतात, हे सर्वांनी लक्षात ठेवावे. या योजनेला मिळालेला प्रतिसाद पाहता मविआच्या पायाखालची जमीन सरकली आहे. मात्र यापुढे महायुतीच्या बाबतीत अधिकृत स्पष्टीकरण देण्यासाठी तीन पक्षांचे अधिकृत प्रवक्ते घोषित करणार आहेत. ते जे बोलतील तेच अधिकृत असतील, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
मी काम करतो, फळाची अपेक्षा नाही - मुख्यमंत्री
याच कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते. त्यांनाही हा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, आपण काम करत रहावे. फळाची अपेक्षा ठेवू नये. मी काम करतोय. कुठलं फळ मिळेल या अपेक्षेने काम करत नाही. मला काय मिळेल यापेक्षा राज्याला काय देईन हे पाहिलं. माझ्या मुख्यमंत्रीपदाचा राज्याला काय फायदा होईल हे मी पाहिलं आहे. आम्ही टीम म्हणून काम करतोय आणि टीम म्हणून काम करत राहणार, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.