पर्यावरणपूरक गणेशमूर्तींच्या विक्रीवर भक्तांची सर्रास लूट

व्यापारी मूर्तीच्या किमतीवर १०० ते २०० टक्के नफा कमवित असल्याचे दिसून येत आहे.
पर्यावरणपूरक गणेशमूर्तींच्या विक्रीवर भक्तांची सर्रास लूट

पर्यावरणपूरक गणेशमूर्तींच्या विक्रीवर १०० ते २०० टक्के नफा मिळवत सर्रास भक्तांची लूट सुरू झाल्याचे दिसून येत आहे. पेणच्या गणेश कार्यशाळांमध्ये शाडू मातीच्या आठ इंचापासून पाच फुटांपर्यंत मूर्ती बनतात. आठ इंचीच्या मूर्तीची किंमत येथे २०० ते २५० रुपयांपासून सुरू होते; मात्र पेण तालुक्याबाहेरील शहरांमध्ये त्याच मूर्ती ५०० ते ६०० रुपयांना विक्री केल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे. म्हणजे व्यापारी मूर्तीच्या किमतीवर १०० ते २०० टक्के नफा कमवित असल्याचे दिसून येत आहे.

मातीची गणेशमूर्ती विसर्जनावेळी पाण्यात सहजतेने विरघळत असल्यामुळे पर्यावरणपूरक गणेश स्थापनेला आता विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पर्यावरण संवर्धनासाठी मातीचे गणपती बसवा, याविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई, पुणे, नगर, नवी मुंबई, ठाणे या शहरांत तर गुजरात, कर्नाटक आदी राज्यांतही पर्यावरणपूरक गणेशमूर्ती स्थापनेवर नागरिकांनी भर दिला आहे.

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विक्रीत काही अंशी घट झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक गणेशमूर्तीच्या व्यवसायात अनेकांनी उडी घेतली आहे. पूर्वी फक्त पेण शहर आणि काही अंशी पेणच्या ग्रामीण भागात शाडू मातीच्या मूर्ती बनत; मात्र आता गणेशमूर्ती तयार करणे आणि विक्री व्यवसाय पेण तालुक्याबाहेर चांगलाच फोफावला आहे.

पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विक्रीतून अनेकांना रोजगार मिळाले आहेत. गत काही वर्षांपासून मातीच्या गणेशमूर्ती स्थापनेसाठी अनेक संस्थांनी पुढाकार घेत जनजागृती सुरू केली आहे. जनजागृतीसह गणेशमूर्ती विक्रीतही या संस्थांनी पुढाकार घेतला आहे.

पेणमधील कारखान्यात शाडू मातीच्या मूर्ती कमी दरात भक्तांसाठी उपलब्ध असतात. ज्यात आठ इंच उंच मातीच्या मूर्तीची किंमत २५० ते ३०० रुपये, एक फुटांच्या मूर्तीची किंमत ६०० रुपये, तर दोन फुटांची १००० ते १२०० रुपयांत विक्री करतात. गणेशमूर्ती विक्रीवर २० ते २५ टक्के नफा घेणे अपेक्षित आहे; मात्र तब्बल २०० टक्के नफा मिळवला जात असल्याचे दिसत आहे. या लुटीवर कुणाचेही नियंत्रण नाही.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in