

मुंबई: देवस्थान इनाम जमिनीचाप्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकार विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात कायदा करणार आहे. याबाबतची तयारी सुरू झाली असून नागरिकांना आपल्या हरकती आणि सूचना नोंदवण्यासाठी कायद्याचा मसुदा लवकरच संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी येथे दिली.
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील पेढे परशुराम देवस्थानच्या इनामी जमिनींचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात बावनकुळे यांच्या दालनात मंगळवारी बैठक झाली. या बैठकीत बोलताना त्यांनी देवस्थान इनाम जमिनींबाबतच्या प्रस्तावित कायद्याबाबत सूतोवाच केले. देवस्थान जमिनींबाबत कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सकारात्मक आहे. नवीन कायद्याची प्रक्रिया राबवताना लोकभावना आणि तांत्रिक बाबींचा विचार केला जाईल. सर्वसामान्य नागरिकांना आणि संबंधित पक्षकारांना आपली मते मांडता यावीत, यासाठी ही माहिती ऑनलाइन उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
रोपवाटिका व्यवसायाला चालना मिळणार
जिल्ह्यातील रोपवाटिका चालकांसाठी माती उपलब्ध करून देताना त्यावर कोणतीही रॉयल्टी आकारली जाऊ नये, असा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश बावनकुळे यांनी रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. यामुळे जिल्ह्यातील फळबाग लागवडीला आणि रोपवाटिका व्यवसायाला मोठी चालना मिळणार आहे. या बैठकीला आमदार शेखर निकम, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदाल आणि महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी पस्थित होते.
बीपीएमएस प्रणालीचे लोकार्पण
राज्यात जमिनीच्या बिगरशेती वापरासाठी आवश्यक असलेल्या अकृषिक (एनए) रुपांतरण प्रक्रियेला आजपासून अधिक सुलभ आणि पारदर्शक बनवणाऱ्या इमारत परवानगी व्यवस्थापन प्रणाली (बीपीएमएस) या ऑनलाइन प्रणालीचे लोकार्पण महसूल मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रणालीत अकृषिक रूपांतरण अधिमूल्य भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना आता एका क्लिकवर ऑनलाइन पद्धतीने रूपांतरण अधिमूल्य भरता येणार असून त्याची नोंद थेट सात-बारा उताऱ्यावर होणार आहे.
फळबागांच्या 'पीकपाणी' नोंदीत बदल
कोकणातील फळबागायतदारांसाठी या बैठकीत एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला. फळबागांचे पीकपाणी नोंद दरवर्षी करण्याऐवजी ते दर तीन वर्षांनी करण्यात यावी. यासाठी जमाबंदी विभाग आणि फलोत्पादन विभागाने संयुक्त प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना महसूल मंत्र्यांनी दिल्या.