Video | महाडिकांनी किक मारली आणि मुश्रीफांनी मांड ठोकली, पोलीस मैदानावरील दृश्य बघून कोल्हापूरकरांना आश्चर्याचा धक्का

पोलीस क्रीडांगणावर भाजप खासदार धनंजय महाडिक आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी एकाच बुलेटवरुन फेरफटका मारल्याने दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांसह पोलीस प्रशासनाला देखील आश्चर्याचा बसला आहे.
Video | महाडिकांनी किक मारली आणि मुश्रीफांनी मांड ठोकली, पोलीस मैदानावरील दृश्य बघून कोल्हापूरकरांना आश्चर्याचा धक्का

शेखर धोंगडे

कोल्हापूर: राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू किंवा कायमचा मित्र नसतो असे म्हणतात. सध्या राज्यातील राजकारण बघता हे वाक्य तंतोतंत खरं ठरत आहे. सध्या राज्यात ज्या घटना घडताय, त्यावर विश्वास बसत नाही. मात्र, हे खरं आहे. आता कोल्हापुरात देखील असाच एक राजकीय किस्सा घडला असून यामुळे साऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. पोलीस क्रीडांगणावर भाजप खासदार धनंजय महाडिक आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी एकाच बुलेटवरुन फेरफटका मारल्याने दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांसह पोलीस प्रशासनाला देखील आश्चर्याचा धक्का बसला आहे. 

कोल्हापूर येथे राज्य नियोजन मंडळाच्या निधीमधून कोल्हापूर पोलिसांच्या गाड्यांचे आधुनिकीकरण करण्यात आले. यासाठी 3.6 कोटी रुपये मंजुर झाले होते. त्यातील 84 लाख रुपयांचा निधी पोलीस विभागाला दिला गेला आहे. उर्वरीत निधी याच महिन्यात वितरीत केला जाणार आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक व आमदार पी. ए. पाटील यांच्या हस्ते पोलीस दलाला वाहनांच्या चाव्यांचे हस्तांतरण करण्यात आले.

 या कार्यक्रमादरम्यान, धनंजय महाडिक यांना बुलेटवरुन फेरफटका मारण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी कोऱ्या-करकरीत बुलेटला किक मारली. यावर मागे राहतील ते हसन मुश्रीफ कसले, त्यांनीही धनंजय महाडीक यांच्या खांद्यावर हात ठेवत मागील सिटवर मांड ठोकली. महडिक यांनी  मुश्रीफ यांना घेऊन पोलिसांच्या भव्य क्रींडागणावर फेरफटका मारला. हा प्रसंग घडला तेव्हा उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसला.

या दोन्ही नेत्यांनी एकाच बुलेटवरुन फेरफटका मारल्याचे व्हिडिओ आणि फोटो प्रचंड व्हायरल झाले. यावर दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.  

राजकारणात कितीही टोकाचा विरोध असला तरी या दोन्ही नेत्यांमधील नाते वेगळेच असल्याचे बोलले जात आहे. आजही मुश्रीफ दिसले की, महाडीक त्यांना आदराने नमस्कार करतात.  महाडिक यांच्या खासदार होण्यात मुश्रीफ यांचा मोठा वाटा आहे. सध्या हे दोन्ही नेते महायुतीत असल्याने धनंजय महाडीक यांना जिल्ह्यात आणखीच बळ मिळाले असल्याचे बोलले जाते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in