
प्राजक्ता पोळ/मुंबई
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी बुधवारी बीडला भेट दिली आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागल्यानंतर प्रथमच अजित पवार बीड दौऱ्यावर आले होते.
अजित पवार यांच्या बीड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे त्यांच्यासोबत असतील का, याबाबत तर्कवितर्क सुरू होते. मात्र, मुंडे अनुपस्थित राहिल्याने त्यांच्या गैरहजेरीबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.
याबाबतच्या चर्चेला उत्तर देताना धनंजय मुंडे यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत आपल्या अनुपस्थितीचे स्पष्टीकरण दिले. त्यांनी सांगितले की, त्यांना बीडच्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचे होते, पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना वैद्यकीय उपचारासाठी मुंबईला जावे लागले. कोणताही गैरसमज नको म्हणून त्यांनी पक्षाच्या नेतृत्वाला याची पूर्वकल्पना दिली होती.
त्यांच्या या स्पष्टीकरणानंतर काही व्हिडिओ समोर आले आहेत. यामध्ये धनंजय मुंडे मुंबईतील एका ‘फॅशन शो’ला हजर असल्याचे दिसले. त्यामुळे त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्याच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यांनी मुद्दाम अजित पवार यांच्या दौऱ्याला हजर राहणे टाळले का, याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत.