
धाराशिव : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी राज्यातील इतर जिल्ह्यांनंतर शनिवारी धाराशिवमध्ये जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चातून भाजप आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करीत त्यांच्या हकालपट्टीची मागणी केली. धनंजय मुंडे यांचे अमली पदार्थांच्या तस्करांसमवेत संबंध असल्याचा आरोप धस यांनी केला आणि मुंडे यांची तस्करांसमवेतची छायाचित्रेच भरसभेत दाखविल्याने खळबळ माजली आहे.
इतकेच नव्हे, तर महासंस्कृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी १० लाख रुपये खर्च केला. पण याचा खर्च पाच कोटी रुपये दाखवला. महासंस्कृती कार्यक्रमाच्या निविदा मुंबईच्या कंपनीला दिल्या होत्या. पण वाल्मिकने परभणीच्या मिनाज नावाच्या व्यक्तीला निविदा दिल्या. वाल्मिकला ईडीची नोटीस येत नाही असे अनेक जणांचे म्हणणे आहे, पण ही घ्या ती नोटीस, असे स्पष्ट करून धस यांनी २ फेब्रुवारी २०२४ची नोटीसही दाखविली. सारंगी महाजन यांनीही जमिनीबाबत आरोप केला आहे. एवढे सगळे होऊनही अजितदादा म्हणतात धनंजय मुंडेंचा दुरान्वयेही संबंध नाही. अजितदादा याला आता मंत्रिमंडळातून काढून टाका, अशा शब्दांत सुरेश धस यांनी आपली भूमिका मांडली आहे. धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून हटवून आमदार मनोज कायंदे यांना मंत्री करण्याची जोरदार मागणीही त्यांनी केली.
सुरेश धस यांनी भरसभेत एका वृत्तपत्राची बातमी वाचून दाखवली. अमली पदार्थ तस्करीची ही बातमी होती. या प्रकरणात अडकलेल्या आरोपींसोबत धनंजय मुंडे यांचा फोटो असल्याचे सांगत धस यांनी भरसभेत हा फोटोही दाखवला. पाकिस्तानातून तस्करी झाली. गुजरातमध्ये ६० कोटींचे १७६ किलो ड्रग्ज पकडले. महाराष्ट्रातील तीन जणांसह पाच जणांना या प्रकरणी अटक करण्यात आली. तीन दिवसांत ८९० कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. या ड्रग्ज प्रकरणात कैलास सानप आणि दत्ता आंधळे हे दोन आरोपी अटकेत आहेत. गेल्या एकदीड वर्षापासून हे आरोपी अटकेत आहेत. त्यांचा कुणाबरोबर फोटो आहे, त्यांचा धनंजय मुंडेंसोबत फोटो आहे, मेन आका, हा फोटी व्हॉटसअॅपवर टाकतो. करा खुलासे आणि द्या आम्हाला शिव्या, असे सुरेश धस म्हणाले.
वाल्मिकच्या मागे कोण ?
अजित पवारांना आवाहन करताना सुरेश धस म्हणाले की, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा. त्याच्या जागेवर सिंदखेडराजा मतदारसंघातून तुमच्या तिकिटावर निवडून आलेल्या कायंदेला मंत्रिपद द्या. माँ जिजाऊंच्या सिंदखेडराजाच्या आमदाराला मंत्रिपद द्या, नाहीतर अन्य कोणाला द्या. पण याला काढा मंत्रिमंडळातून, याने आमचे वाटोळे केले आहे. हा माणसं मारायला लागलाय. दुपारीच माणूस मारला, पुन्हा याला सत्तेत ठेवला तर हा दिवस उगवताच माणसं मारायला सुरू करेल. एकट्या वाल्मिक कराडला कशाला दोष देता, वाल्मिकच्या मागे कोण उभा आहे ते पण बघितले पाहिजे आणि हे म्हणतात हत्या प्रकरणात माझा काय संबंध, असे कसे, असा सवाल धस यांनी विचारला आहे.
मस्ती उतरविणार - जरांगे
दरम्यान, मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनीही धाराशिवमधील मोर्चातून धनंजय मुंडेंवर हल्ला चढविला. जरांगे म्हणाले, जर या पुढे मराठ्यांना त्रास झाला तर सामना मनोज जरांगे यांच्याशी आहे. धनंजय मुंडे यांना सांगतो, तुमची टोळी थांबवा. ही धमकी नाही तर सावध करत आहे. यापुढे तुमच्या गुंडांनी कोणाला त्रास दिला तर लक्षात ठेवा. त्यांचा बंदोबस्त आम्ही करणार आहोत. मनोज जरांगे म्हणाले, संतोष देशमुख प्रकरणातील खून प्रकरणातील आरोपींवर मकोका लागला आहे. पण जर खंडणीतील आरोपीला मकोका लागला नाही तर आम्हाला हा मकोका मान्य नाही.