दोन मिनिटेही बोलता येत नाही; धनंजय मुंडे ‘बेल्स पाल्सी’ आजाराने त्रस्त

अन्न आणि नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांची प्रकृती बिघडली असून त्यांना ‘बेल्स पाल्सी’ हा दुर्मिळ आजार जडला आहे.
दोन मिनिटेही बोलता येत नाही; धनंजय मुंडे ‘बेल्स पाल्सी’ आजाराने त्रस्त
एक्स @dhananjay_munde
Published on

मुंबई : अन्न आणि नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांची प्रकृती बिघडली असून त्यांना ‘बेल्स पाल्सी’ हा दुर्मिळ आजार जडला आहे. या आजारामुळे त्यांना सलग दोन मिनिटेही बोलता येत नसल्याने ते मंत्रिमंडळाच्या बैठकीला आणि जनता दरबार कार्यक्रमाला गैरहजर राहिल्याचे सांगण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या दोन्ही डोळ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. यानंतर आता धनंजय मुंडेंना ‘बेल्स पाल्सी’ नावाचा दुर्मिळ आजार झाला आहे. यामुळे त्यांच्यावर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धनंजय मुंडे यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरवरून एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी ‘बेल्स पाल्सी’ नावाचा आजार झाल्याची माहिती दिली आहे. तसेच ते पुन्हा कधी रूजू होणार याबद्दलही सांगितले आहे.

मुंडे काय म्हणाले?

माझ्या दोन्ही डोळ्यांवर पंधरा दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉ. तात्याराव लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया पार पडल्या. साधारण दहा दिवस त्यांनी तीव्र प्रकाश, धूळ आणि उन्हापासून डोळ्यांची काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. त्याचदरम्यान मला ‘बेल्स पाल्सी’ नावाच्या आजाराचे निदान झाले. त्याच्यावरील उपचार सध्या रिलायन्स हॉस्पिटलमधील डॉ. अरुण शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या आजारामुळे सध्या मला सलग दोन मिनिटेही व्यवस्थित बोलता येत नाही, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

त्यामुळे सध्या एक-दोन कॅबिनेट आणि पक्षाच्या जनता दरबार कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आले नाही. याबाबत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच आमच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कल्पना दिलेली आहे. लवकरच या आजारावर मात करून मी पुन्हा जनसेवेच्या कामात रूजू होईन, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

बेल्स पाल्सीची लक्षणे

बेल्स पाल्सी हा आजार झालेल्या व्यक्तीच्या चेहऱ्याचे स्नायू कमकुवत होतात. यामुळे चेहऱ्याच्या एका बाजूला अचानक अशक्तपणा येतो. काहीवेळा अर्धांगवायू देखील होऊ शकतो. यामुळे तुम्हाला एक डोळा बंद करण्यात अडचणी येऊ शकतात. तसेच हसण्यासही त्रास होऊ शकतो. हा आजार झालेल्या व्यक्ती पूर्णपणे ठीक होण्यासाठी साधारण काही आठवड्यांचा कालावधी लागतो.

logo
marathi.freepressjournal.in