
मुंबई : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरुन राज्यातील मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप सुरू झालेले असतानाच आता दिवंगत प्रवीण महाजन यांची पत्नी सारंगी महाजन यांनीही आपली जमीन धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी हडपल्याचा आरोप केल्याने खळबळ माजली आहे. यासंदर्भात आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेणार असल्याचे सारंगी महाजन यांनी म्हटले आहे.
जिरेवाडीतील माझी जमीन धनंजय मुंडे आणि त्याच्या माणसांनी हडपली आहे. गोविंद मुंडे या व्यक्तीने माझ्याशी संपर्क करुन माझी जमीन हडप केली. त्यांनी आम्हाला धाक दाखवून रजिस्ट्री लावून जमीन हडपली. रजिस्ट्री होत नाही तोपर्यंत त्यांनी आम्हाला सोडले नाही, त्यांनी शंभर रुपयांच्या बॉन्डवर सह्या करुन घेतल्या. सही केली नाही तर परळी सोडू देणार नाही असा धाक दाखवला, असा आरोप सारंगी महाजन यांनी केला. सारंगी महाजन म्हणाल्या, आम्ही १४ वर्षापासून यांच्या पाठीमागे आलेलो नाही. आमचे आम्ही राहत होतो. यांना आमच्या नावाची जमीन हडप करण्याचे कारण काय होते, यामध्ये पंकजा आणि धनंजय यांचा हात आहे, असा दावा महाजन यांनी केला. त्यांनी ६ जून २०२२ ला रजिस्ट्री लावून घेतली आणि कागदपत्र नंतर पाठवून दिली. त्या कागदपत्रांमध्ये त्यांनी जमिनीचा व्यवहार झाला, असे लिहिले होते. आता मी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे, असेही महाजन म्हणाल्या.
साडेतीन कोटीची जमीन त्यांनी २१ लाखात घेतली, हा घोटाळा झाल्याचे आमच्या लक्षात आले. त्यांनी माझी जमीन दाखवलीच नाही. ही जमीन गोविंद मुंडे, पल्लवी गिते आणि दशरथ चाटे यांच्या नावावर आहे, या तिघांनाही मी ओळखत नाही. गोविंद मुंडे हे धनंजय मुंडे यांच्या घरचे नोकर होते. नंतर ते नगरसेवक झाले, आता त्यांच्याकडे मोठी माया आहे, असेही महाजन म्हणाल्या.
सारंगी महाजन म्हणाल्या, मी धनंजय मुंडे यांच्याकडे गेले होते, तेव्हा ते टाळाटाळ करत होते. माझ्याकडे यायला पाहिजे होते, परस्पर जमीन विकून टाकली. तुमचा पाठपुरावा कमी पडला, असे धनंजय मुंडे मला म्हणाले. ते मला त्रास देत असल्याचे जाणवले. मी परळीत गेले की ते परळीतून बाहेर जायचे. दीड वर्ष त्यांनी असेच केले. मी परळीचा किंग आहे, परळीत जमीन विकली की मला लगेच कळते, माझ्याशिवाय कोणाच्या जमिनी विकल्या जात नाही, असे धनंजय मुंडे मला बोलले, त्यावर मी माझ्या जमिनीमध्ये यांचा हात असेल हे समजून गेले, नंतर मला वाटले ज्याने माझी जमीन लाटली आहे त्याच चोराकडे मी आली आहे, असेही सारंगी महाजन म्हणाल्या.
कराडच्या गुंडांनी दिली धमकी
सारंगी महाजन म्हणाल्या, या प्रकरणात कधी वाल्मिक कराडची भेट झाली नाही. पण, यात वाल्मिक कराडचा हात असू शकतो. कारण ते वाल्मिक कराडला सांगतात, ते खाली त्यांच्या माणसांना सांगतात. मला त्याच लोकांनी धाक दाखवला होता, असा दावाही महाजन यांनी केला.