
बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात वादात अडकलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर मंगळवारी सकाळी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. याच हत्याप्रकरणात, मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडला अटक झाल्यावर विरोधकांसह सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया देखील मुंडेंच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झाल्या होत्या. सोमवारी विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुंडेंच्या राजीनाम्यावरुन विरोधकांनी जोरदार घोषणाबाजीही केली होती. अशातच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मात्र संतापाची प्रचंड लाट उसळली आणि अखेर मुंडे यांनी राजीनामा दिला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सोमवारी मध्यरात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय झाला होता, असे समजते. सुनील तटकरे आणि धनंजय मुंडेही या बैठकीत होते. त्यानंतर सकाळी मुंडेंनी राजीनामा दिला. सकाळीच मुंडे यांनी स्वीय सहायकाच्या माध्यमातून राजीनामा सागर बंगल्यावर पाठवल्याची माहिती आहे.
दरम्यान, धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा मी स्वीकारला असून पुढील कार्यवाहीसाठी तो माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना सांगितले आहे.
९ डिसेंबर २०२४ रोजी बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोन दिवसांपूर्वीच (दि.१) जवळपास ८० दिवसांनी न्यायालयात १५०० पानांचे आरोपपत्र दाखल केले. राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटचा साथीदार वाल्मिक कराड हाच देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचे आरोपपत्रामध्ये म्हटले आहे.