
मुंबई : गेल्या दोन महिन्यांपासून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने राज्यात संतापाची लाट पसरली आहे. याबाबत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी त्यांच्यावर वाढता दबाव आहे. आतापर्यंत धनंजय मुंडे यांना पाठीशी घालणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता कठोर निर्णय घेतला आहे. त्यांनी धनंजय मुंडे यांच्या पक्षांतर्गत चौकशीसाठी समिती नेमली आहे.
धनंजय मुंडेंवर अनेक आरोप लावण्यात आले असून त्यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव आणला जात आहे. राज्यभरात मुंडेंविरोधात निर्माण झालेल्या संतापाचा पक्षाच्या प्रतिमेवर परिणाम होण्याची भीती लक्षात घेऊन आता अजित पवार सावध झाले असून त्यांनी याप्रकरणी आता लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांबाबत चौकशीसाठी विशेष चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. धाराशिवचे उपजिल्हाधिकारी संतोष भोर हे या समितीचे अध्यक्ष असतील, तर अर्थ आणि सांख्यिकी संचालनालय अपर संचालक म. का. भांगे आणि जालना जिल्हा नियोजन अधिकारी सुनील सूर्यवंशी हे दोघे या चौकशी समितीचे सदस्य असतील.
एका आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश
बीड जिल्हा नियेाजन समितीच्या निधीवाटपात दुजाभाव झाल्याचा आरोप मुंडेंवर करण्यात आला आहे. याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्या पक्षांतर्गत चौकशीचे आदेश अजित पवार यांनी दिले आहेत. तीन सदस्यीय चौकशी समिती यासाठी गठित करण्यात आली असून तिला एका आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश पवारांनी दिले आहेत.